नेर्ले : अर्ज माघारीच्या मुदतीनंतर यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक तिरंगी होणार, हे स्पष्ट झाल्याने प्रचारात आता रंगत येणार आहे. कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर जाहीर सभा, मेळावे, जेवणावळी तसेच जाहीर प्रचाराला परवानगी नसल्याने परंपरागत प्रचाराचा माहोल नेर्ले, तांबवे गटामध्ये थंडावला आहे. उमेदवारांनी मात्र व्यक्तिगत गाठी-भेटींवर भर दिला आहे. या गटात दोन सख्ख्या चुलत भावांची लढत रंगतदार ठरणार आहे.
नेर्ले-तांबवे गटांमध्ये नेर्ले हे गाव कृष्णाच्या कार्यक्षेत्रात निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर नेहमीच महत्त्वपूर्ण ठरले आहे. हे गाव राजकीयदृष्ट्या संवेदनशील असून, कृष्णाच्या निवडणुकीचे वाळवा तालुक्यातील महत्त्वपूर्ण केंद्र बनते. यामुळेच तिन्ही पॅनेलच्या नेत्यांचा गावामध्ये राबता असतो. या गटामध्ये नेर्ले, तांबवे, वाटेगाव, कासेगाव, कालवडे, बेलवडे ही मोठी गावे, तर काळमवाडी, केदारवाडी, धोत्रेवाडी, धनगरवाडी, शेणे, कापूसखेड ही मतदानाच्या दृष्टीने छोटी गावे येतात. नेर्ले गाव कार्यक्षेत्रातील मतदानाच्या दृष्टीने दुसऱ्या क्रमांकावर असून, इथे घडणाऱ्या घडामोडींचे पडसाद कृष्णाच्या निवडणुकीवर दूरगामी परिणाम घडवितात. सहकार पॅनेलच्यावतीने ज्येष्ठ नेते जनार्दन पाटील यांचे जावई, माजी सरपंच संभाजीराव पाटील हे निवडणूक लढवीत आहेत, तर त्यांचे सख्खे चुलत भाऊ, माजी सरपंच प्रशांत पाटील हे डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या नेतृत्वाखाली रयत पॅनेलमधून निवडणूक लढवीत आहेत. सख्खे चुलत भाऊ आमने-सामने उभे ठाकल्यामुळे ही लढत चुरशीची ठरणार आहे. या गटामध्ये सहकार पॅनेलकडून कारखान्याचे माजी उपाध्यक्ष लिंबाजी पाटील, वाठारचे उद्योजक दत्तात्रय देसाई, महिला उमेदवार इंदुमती जाखले हे उभे आहेत. संस्थापक पॅनेलकडून विद्यमान संचालक सुभाष पाटील, तांबवेचे विक्रमसिंह पाटील व बेलवडेचे मारुती मोहिते हे निवडणूक लढवीत आहेत. रयत पॅनेलकडून मनोहर थोरात-कालवडे, प्रशांत पाटील, उद्योजक गणेश पाटील हे निवडणूक लढवीत आहेत.
तीनही उमेदवारांनी व्यक्तिगत गाठीभेटींवर भर दिला आहे. ‘सकाळचं नेरलं, दुपारी फिरलं’ अशी एक म्हण आहे. यामुळे सर्वांचे येथे लक्ष लागून असते. पॅनेलचे कार्यकर्ते सभासदांना व्यक्तिगत भेटत आहेत. मंत्री विश्वजित कदम यांनीही रयत पॅनेलसाठी यंत्रणा सक्रिय केली आहे. एकंदरीत कृष्णाच्या तिरंगी लढतीतील चुरशीचे रंग आता दिसायला सुरुवात झाली आहे.