वारणावती : चांदोली धरणाच्या करुंगलीजवळील पोटकालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाल्याने कालव्यातून सोडलेल्या पाण्याचा निचरा झाला नाही. त्यामुळे रस्त्यावर पाण्याचे उमाळे फुटले आहेत. तसेच गेटजवळ पाणी साचून डोह तयार झाला आहे. ठेकेदाराने केलेले कालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी होत आहे. शिराळा तालुक्याच्या पश्चिम विभागातील करुंगली येथील चांदोली धरणाच्या मुख्य कालव्यापासून पोटकालव्याचे काम सुरू आहे. पण हे काम ठेकेदाराने यंत्राचा कोणताही वापर न करता मजूर वापरून निकृष्ट दर्जाचे काम केले आहे. त्यामुळे पुन्हा पोटकालव्याच्या गळतीमुळे शेतीचे नुकसान होत आहे. याबाबत ठेकेदाराने अधिकारी व कर्मचारी यांच्या संगनमताने हा प्रकार केला असल्याची चर्चा आहे. याकडेही कालवा विभागाच्या अधिकाऱ्यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याची प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. पोटकालव्याच्या आतील माती, झुडपे, दगड न काढता व कोणत्याही प्रकारची स्वच्छता न करता, मातीत मिसळून खडी व सिमेंटचा वापर करून निकृष्ट दर्जाचे काम करण्यात आले आहे. या कालव्याजवळील गेटजवळील कामे सळईचा वापर न करता मजूर वापरून निकृष्ट करण्यात आली आहेत. रस्त्याजवळील पोटकालव्याची पाईप सखल भागात व कालव्याचे काम चढावरून केले आहे. त्यामुळे पाण्याचा निचरा न झाल्याने पाण्याचा डोह तयार झाला आहे. चांदोली धरणाच्या पोटकालव्याचे काम निकृष्ट दर्जाचे असून या कामाची वरिष्ठ पातळीवरून चौकशी व्हावी व संबंधित ठेकेदारांकडून चांगले काम करवून घेतले जावे, तरच रस्त्याजवळील पोटकालव्याच्या पाण्यामुळे होत असलेली गळती थांबेल, तसेच अशा ठेकेदाराची चौकशी करून चांगल्याप्रकारे कालव्याचे काम करण्याची मागणी शेतकरी वर्गातून होत आहे. (वार्ताहर)
‘चांदोली’चा करुंगली पोटकालवा निकृष्ट
By admin | Published: April 12, 2017 12:40 AM