सांगलीत काँग्रेसच्या बैठकीत पराभवाचे मंथन : मोठी सभा न झाल्याने नाराजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 6, 2019 09:43 PM2019-11-06T21:43:48+5:302019-11-06T21:45:53+5:30
भविष्यात चांगली कामगिरी येथे करता येऊ शकते. प्रतापसिंह रजपूत यांनीही, सांगलीतील काँग्रेसची लढत वाखाणण्याजोगी असल्याचे सांगून, हा पराभव टाळता येऊ शकत होता, असे मत मांडले.
सांगली : विधानसभा निवडणुकीत सांगली, मिरज या दोन्ही मतदारसंघात झालेल्या पराभवाचे मंथन बुधवारी सांगलीतील काँग्रेसच्या बैठकीत करण्यात आले. काही पदाधिकाऱ्यांनी, सांगली, मिरजेत मोठ्या नेत्यांच्या सभा न झाल्याने पराभव झाल्याचे मत मांडले. तासाभराच्या चिंतनानंतर, पुन्हा नव्या जोमाने मतदारसंघात ताकद वाढविण्याचा निर्धारही करण्यात आला.
सांगलीत काँग्रेस भवनात दुपारी दोन वाजता जिल्हाध्यक्ष आ. मोहनराव कदम यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. या बैठकीत सांगली, मिरजेतील काँग्रेस उमेदवारांच्या पराभवाची कारणमीमांसा करण्यात आली. जिल्हा उपाध्यक्ष नामदेवराव मोहिते म्हणाले की, सांगलीत काँग्रेसला निसटता पराभव स्वीकारावा लागला. वास्तविक विजयाची शंभर टक्के खात्री होती. पक्षस्तरावरून आणखी बळ मिळायला हवे होते. काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांच्या सभा सांगलीत झाल्या असत्या, तर निकाल काँग्रेसच्या बाजूने लागला असता. भविष्यात अशाप्रकारचे दुर्लक्ष टाळायला हवे.
मिरज तालुकाध्यक्ष अण्णासाहेब कोरे म्हणाले की, सांगली, मिरजेतील नागरिकांच्या मतांचा कौल पाहिला, तर तो भाजपविरोधी होता. इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदान काँग्रेसला झाले आहे. आणखी थोडे काटेकोर नियोजन केले असते, तर या दोन्ही जागांवर काँग्रेसला विजय मिळविणे शक्य झाले असते.
दिलीप पाटील म्हणाले की, पलूस-कडेगाव येथे ज्यापद्धतीने वरिष्ठ नेत्यांच्या सभा झाल्या, तशा सभा सांगलीत होणे गरजेचे होते. मोठ्या सभांमुळे मतपरिवर्तन होऊ शकते. सांगली जिल्हा अजूनही काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. त्यामुळे भविष्यात चांगली कामगिरी येथे करता येऊ शकते. प्रतापसिंह रजपूत यांनीही, सांगलीतील काँग्रेसची लढत वाखाणण्याजोगी असल्याचे सांगून, हा पराभव टाळता येऊ शकत होता, असे मत मांडले.
आटपाडी तालुकाध्यक्ष डी. बी. पाटील म्हणाले की, जिल्'ातील दोन जागा मिळाल्याने ऊर्जा मिळाली असताना, या दोन जागांची भर पडली असती तर आणखी आनंद झाला असता.यावेळी बैठकीस जिल्हा उपाध्यक्ष बाळासाहेब उपाध्ये, शिराळ्याचे रवी पाटील, खानापूरचे तालुकाध्यक्ष रवींद्र देशमुख, विट्याचे सूर्यकांत पाटील, बी. डी. पाटील, डॉ. राजेंद्र मेथे, शेवंता वाघमारे, बिपीन कदम, सनी धोत्रे आदी उपस्थित होते.
मी खचलो नाही : पृथ्वीराज पाटील
काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील म्हणाले की, माझा पराभव झाला असला तरी, ८७ हजार नागरिकांनी माझ्या बाजूने कौल दिला आहे. पराभवाने मी खचलेलो नाही. उलट आपत्तीकाळात नागरिकांशी संवाद साधून मी पक्षाचे कार्य सुरू केले आहे. पक्षाचे सर्व नेते, पदाधिकारी यांनी जी साथ दिली, त्याबद्दल मी समाधानी आहे.
चुका टाळून पुढे जाऊ : मोहनराव कदम
जिल्हाध्यक्ष कदम म्हणाले की, विधानसभा निवडणुकीला नियोजनात काही चुका झाल्याची भावना पदाधिकाऱ्यांनी मांडली आहे. पराभवाची कारणमीमांसा प्रत्येकाने केली पाहिजे. कारणांचा शोध घेतल्यानंतर त्या चुका टाळून आपण पुढे गेले पाहिजे. भविष्यात जिल्'ातील पक्षीय संघटन अधिक मजबूत करण्यासाठी एकसंधपणे आपण सर्वजण कार्यरत राहू.