सांगली : बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटेने, संशयित आरोपी अनिकेत कोथळे व अमोल भंडारे यांनी हिसडा मारुन पलायन केल्याच्या रचलेल्या बनावाचा तपासही रविवारी ‘सीआयडी’कडे आला. पोलिस निरीक्षक गीता बागवडे स्वतंत्रपणे याचा तपास करणार आहेत.दोघे पळून गेल्याची फिर्याद खुद्द कामटेने दिली होती. या दाखल झालेल्या फिर्यादीचीही चौकशी केली जाणार आहे. दरम्यान, अमोल भंडारेला घेऊन कृष्णा नदीच्या घाटावर बसलेल्या ‘त्या’ दोन संशयितांचे धागेदोरे सीआयडीला मिळाले आहेत. लवकरच त्यांना पकडण्यात यश येईल, असे सांगण्यात आले.कवलापूर (ता. मिरज) येथील संतोष गायकवाड यांना ५ नोव्हेंबरच्या रात्री सांगलीच्या मुख्य बस स्थानकावर चाकूच्या धाकाने लुबाडले होते. याप्रकरणी सांगली शहर पोलिसांनी संशयावरून ६ नोव्हेंबरला अनिकेत कोथळे व अमोल भंडारेला अटक केली होती. हा तपास बडतर्फ पोलिस उपनिरीक्षक युवराज कामटे याच्याकडे होता. अनिकेत व अमोल भंडारेला तीन दिवसांची पोलिस कोठडी मिळाली होती.कोठडीच्या पहिल्याचदिवशी अनिकेत व भंडारेला चौकशीसाठी ‘डीबी’ रुममध्ये आणण्यात आले होते. कामटेच्या पथकाने या दोघांना नग्न केले. यातील अनिकेतला उलटा टांगून बेदम मारहाण केली होती. यामध्ये त्याचा मृत्यू झाला होता. हे प्रकरण अंगलट येऊ नये, यासाठी कामटे, बडतर्फ हवालदार अनिल लाड, अरुण टोणे, नसरुद्दीन मुल्ला व झिरो पोलिस झाकीर पट्टेवाले यांनी, अनिकेत व अमोल भंडारे हिसडा मारुन ‘डीबी’ रुममधून पळून गेल्याचा बनाव रचला. यासंदर्भात कामटेने स्वत: शहर पोलिस ठाण्यात, दोघे पळून गेल्याची फिर्याद दाखल केली होती.अनिकेतचा मृतदेह आंबोली (जि. सिंधुदुर्ग) येथे जाळल्याचे उघडकीस येताच, कामटेच्या पथकाने अनिकेत व अमोल भंडारे पळून गेल्याचा बनाव रचल्याचे निष्पन्न झाले होते. सुरुवातीला आरोपी पलायनाचा हा तपास शहर पोलिस ठाण्यातील पोलिस उपनिरीक्षक रोहित चौधरी यांच्याकडे दिला होता. पण हा बनाव असल्याने विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे-पाटील यांनी हा तपास एलसीबीकडे सोपविला होता. मात्र आता हा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आला आहे. पोलिस निरीक्षक गीता बागवडे स्वतंत्रपणे याचा तपास करणार आहेत. कामटेने आरोपी पळून गेल्याची फिर्याद कोणत्याआधारे दिली, ही फिर्याद कोणी दिली, त्यावर सही कोणी केली, याचाही आता तपासातून उलगडा होण्याची शक्यता आहे. पोलिस ठाण्यातील सीसीटीव्ही, डीव्हीआर तपासणीचा अहवाल आल्यानंतर तपासाला गती मिळणार आहे.कोथळे कुटुंबाचे आजपासून उपोषणअनिकेत कोथळे याच्या खुनाचा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, त्याच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय सेवेतील नोकरीत सामावून घ्यावे, या मागणीसाठी अनिकेत कोथळेचे कुटुंबीय आंदोलन करत आहेत. दि. ११ डिसेंबरपासून (सोमवार) जिल्हाधिकारी कार्यालयासमोर कोथळे कुटुंबीय बेमुदत उपोषणास बसणार आहेत. जोपर्यंत या मागण्या मान्य होत नाहीत, तोपर्यंत उपोषण सुरु राहील, असा इशारा कोथळे कुटुंबियांनी दिला आहे.‘त्या’ दोघांच्या मागावरअनिकेत व अमोल भंडारे पळून गेल्याचा बनाव रचला. अनिकेतचा मृत्यू झाला होता. मृतदेह कोणाला दिसू नये, यासाठी तो पोलिस ठाण्याच्या बेकर मोबाईल व्हॅनमध्ये ठेवला. भंडारेही कोणाला दिसला, तर प्रकरण अंगलट येऊ शकते, असा विचार करुन कामटेने त्याच्या परिचयाच्या दोन व्यक्तींना कृष्णा नदीच्या घाटावर बोलावून घेतले होते व भंडारेला त्यांच्या ताब्यात दिले होते. पहाटेपर्यंत या दोन संशयित व्यक्ती भंडारेला घाटावर घेऊन बसल्या होत्या. या दोन संशयितांचा सीआयडीकडून युद्धपातळीवर शोध सुरु आहे. त्यांना पकडण्यात लवकरच यश येईल, असे सांगण्यात आले.
पलायनाच्या बनावाचा तपासही सीआयडीकडे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 11, 2017 1:05 AM