सांगली : महापालिकेच्या वीजबिल घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. यात अनेकांचा सहभाग असल्याचे समोर येत आहे. काही व्यापाऱ्यांना या प्रकरणात नाहक गोवण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणाची सीआयडी चौकशी करावी, अशी मागणी नागरिक जागृती मंचचे जिल्हाध्यक्ष सतीश साखळकर यांनी केली आहे. याबाबत पालकमंत्री जयंत पाटील यांना निवेदनही देण्यात आले.
साखळकर म्हणाले की, महापालिकेकडून वीजबिलापोटी दरमहा धनादेश दिला जात होता. महावितरणचा कंत्राटी कामगार हे धनादेश घेऊन जात असे. त्याने महापालिकेचे धनादेश महावितरण कार्यालयात न भरता एका खासगी वीजबिल भरणा केंद्रात भरले आहेत. महापालिकेच्या विजेची बिले न भरता या धनादेशातून खासगी व्यापाऱ्यांची बिले भरण्यात आली आहेत. संबंधित व्यापाऱ्यांकडूनही बिलाची रक्कम घेण्यात आली आहे. याप्रकरणी महापालिकेने पोलिसांत तक्रार केली असून, महावितरणचा कामगार, खासगी बिल भरणा केंद्राच्या व्यवस्थापकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
आता या प्रकरणात कोणताही दोष नसताना काही व्यापाऱ्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत आहे. वीज बिल घोटाळ्याची व्याप्ती मोठी आहे. तसेच हे प्रकरणही गंभीर असून, याची सीआयडी चौकशी केल्यास मोठा घोटाळा उघडकीस येईल, असेही सांगितले.