जत : जत तालुका भाजपच्या माजी तालुकाध्यक्षांचे वाहन चालक व भाजपच्याच एका विद्यमान नगरसेवकात मंगळवारी सिनेस्टाईल हाणामारी झाली. ही घटना प्रांताधिकारी कार्यालय व जत पोलीस ठाण्याच्या परिसरात दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान घडली. याप्रकरणी पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल नव्हता. या घटनेची जत शहरासह तालुक्यात खुमासदार चर्चा सुरू हाेती.
जत तालुका भाजपच्या माजी अध्यक्षांचे वाहनचालक व एक नगरसेवक कामानिमित्त प्रांताधिकारी कार्यालय परिसरात आले होते. व्यवसायातील स्पर्धा व अन्य काही कारणामुळे त्यांच्यात सुरुवातीला बाचाबाची व शाब्दिक चकमक झाली. त्यानंतर एकमेकांच्या अंगावर धावून जाऊन मारहाण करण्यापर्यंत हे प्रकरण हातघाईवर गेले. तशाच परिस्थितीत पोलिसांनी त्यांना पोलीस ठाण्याच्या आवारात पकडून आणले. येथेही त्यांची हाणामारी झाली. एकमेकांच्या अंगावर चार चाकी गाडी घालण्याचा प्रयत्न झाला. यावेळी बघ्यांची माेठी गर्दी झाली हाेती.
या घटनेची जत शहरासह तालुक्यात खुमासदार चर्चा सुरू हाेती. रात्री उशिरापर्यंत जत पोलिसात या घटनेची नोंद नव्हती.
चौकट
जत पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी विनोद कांबळे यांच्याशी यासंदर्भात संपर्क साधला असता ते म्हणाले ,सदरची घटना गंभीर आहे. मी स्वतः व काही पोलीस कर्मचारी साक्षीदार आहोत. आम्ही वर्दी तयार केली असून गुन्हा दाखल करणार आहे.