सांगली : जिल्ह्यासह देशभरात लॉकडाऊनचा कालावधी वाढल्यामुळे बँकांमधील गर्दी पुन्हा वाढली आहे. बँकांनी अनेक उपाययोजना केल्या असल्या तरी, गर्दी नियंत्रणात आणताना त्यांची सर्कस सुरू आहे. एकाचवेळी शासनाच्या विविध योजनांचे पैसे तसेच पेन्शन जमा झाल्यामुळे बँकासमोर लांब रांगा लागल्या आहेत. प्रसंगी पोलिसांना नियंत्रणकामी पाचारण करण्याची वेळ बँकांवर आली आहे.
जन-धन योजनेची जिल्ह्यात सुमारे पावणेतीन लाख खाती आहेत. या खात्यांमध्ये प्रतिमाह ५०० रुपयांप्रमाणे तीन महिन्यांचे १ हजार ५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. खात्याच्या क्रमांकानुसार या रकमा टप्प्याटप्प्याने जमा होत आहेत. त्यामुळे जनधन खात्यातून पैसे काढणाऱ्यांची संख्या वाढली आहे. पंतप्रधान किसान सन्मान निधीच्या २००० रुपयांचा हप्ताही शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाला आहे. त्यामुळे शेतकºयांनीही बॅँकेत पैसे काढण्यासाठी रांगा लावल्या आहेत. ही गर्दी नियंत्रणात आणण्यासाठी उपाययोजना सुरू आहेत.
२ एप्रिलपासून बँकांची काही कामे पोस्टाकडे सोपविली आहेत. यामध्ये जन-धन योजनेच्या पैशासह खात्यावरील कोणतेही पैसे कुठूनही काढण्याची सोय केली आहे. त्यामुळे जन-धनचे पैसे पोस्टमनमार्फत ग्राहकांपर्यंत पोहोचविणे किंवा ग्राहकांना स्थानिक पोस्ट शाखेमधून पैसे काढता येणे शक्य होत आहेत. याचा काही प्रमाणात बँकांना दिलासा मिळाला आहे.पोस्टाच्या सांगली जिल्ह्यात एकूण साडेतीनशेहून अधिक शाखा आहेत. मुख्य पोस्ट कार्यालय, विभागीय कार्यालये तसेच शाखा मिळून ४१९ कार्यालये जिल्ह्यात आहेत.
पोस्टमनची संख्याही मोठी आहे. ज्या गावांमध्ये राष्ट्रीयीकृत बँकांच्या शाखा नाहीत, त्याठिकाणी पोस्टमनमार्फत पैसे पोहोचविले जात आहेत. पंतप्रधान किसान सन्मान योजनेचेही पैसे पोस्ट कार्यालयांमधून काढता येत आहेत. त्यामुळे बँकांमधील गर्दी कमी होण्यास आता मदत मिळत आहे.