सांगली : महापालिका क्षेत्रात किती नागिरकांना कोरोना होऊन गेला याचा शोध घेण्यासाठी भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेकडून (आयसीएमआर) तिसऱ्यांदा सिरो सर्व्हे करण्यात येत आहे. यात शहरातील ८० नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत. हे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेकडे पाठविले जाणार असून तीन आठवड्यांनी त्याचा अहवाल येणार आहे.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मे महिन्यात आयसीएमआरने पहिल्यांदा सिरो सर्व्हे केला होता. त्यानंतर ऑगस्ट महिन्यात दुसऱ्यांदा सर्व्हे केला. आता तिसऱ्यावेळी सर्व्हे करण्यात येत आहे. यातून नागरिकांची कोविडचा सामना करण्याची प्रतिकार क्षमता किती वाढली आहे, याची माहिती मिळणार आहे. याचा अहवाल तीन आठवड्यांनी मिळणार आहे. सोमवारी दोन पथकांद्वारे महापालिका क्षेत्रातील ८० नागरिकांच्या रक्ताचे नमुने घेण्यात आले. जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सुजाता जोशी, महापालिका आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र ताटे, वैद्यकीय अधिकारी डॉ. शीतल धनवडे आणि त्यांचे सहकारी आयसीएमआर पथकासोबत काम करीत आहेत.
मे महिन्यात करण्यात आलेल्या सिरो सर्व्हेत अडीच टक्के लोकांच्या रक्तात कोविडचे नमुने सापडले होते. तर ऑगस्टमध्ये केलेल्या दुसऱ्या सिरो सर्व्हेत ११ टक्के लोकांमध्ये कोविडचे नमुने आढळून आले होते. आताच्या सर्व्हेनंतर आणखी किती जणांना कोरोना होऊन गेला, याची माहिती मिळणार आहे.
फोटो ओळी :- भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेच्यावतीने सोमवारी महापालिका क्षेत्रातील नागरिकांच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले.