मिरज : मिरज शहरात काही भागात दूषित पाण्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. मुजावर गल्ली परिसरात दूषित पाण्यामुळे संतप्त नागरिकांनी नगरसेवकांना जाब विचारल्याने वादावादीचा प्रकार घडला. मुजावर गल्ली येथे टँकरने शुध्द पाण्याचा पुरवठा सुरू करण्यात आला.दर्गा परिसरातील मुजावर गल्ली परिसरात महिनाभर अपुरा, कमी दाबाने व दूषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिक संतप्त आहेत. पाणीपुरवठा करणाऱ्या जलवाहिनीत सांडपाणी मिसळत असल्याने या परिसरात दूषित पाणीपुरवठा होऊन अनेक नागरिकांना जुलाब व उलट्या होत आहेत.महापालिका पाणीपुरवठा विभाग तक्रारीची दखल घेण्यात येत नसल्याने आज नागरिक दूषित पाणी घेऊन नगरसेवक मैनुद्दीन बागवान यांच्या कार्यालयात गेल्यानंतर नगरसेवक मैनुद्दीन बागवान व डॉ. नर्गिस सय्यद हे मुजावर गल्लीत पाहणीसाठी गेले.यावेळी स्थानिक नागरिकांनी त्यांना जाब विचारत किमान रमजान महिन्यात शुध्द पाणीपुरवठ्याची मागणी केल्याने नगरसेवकांसोबत वादावादी झाली.
गेल्या काही दिवसांपासून या परिसरातील जलवाहिनीला गळतीमुळे सांडपाणी जलवाहिनीत जात असून, जलवाहिन्यांची स्वच्छता केल्यानंतरही दूषित पाण्याची समस्या कायम आहे. यामुळे आजपासून मुजावर गल्ली परिसरात टँकरने पाणीपुरवठा सुरू करण्यात आला.मैनुद्दीन बागवान यांनी दूषित पाण्याची समस्या सोडविण्याकडे दुर्लक्ष करणाऱ्या महापालिका प्रशासनाविरुध्द आंदोलनाचा इशारा दिला.