ओळी : शहरातील विनायकनगरमध्ये रस्ते दुरुस्तीसाठी महिलांनी रस्त्यावर ठाण मांडले होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शंभर फुटी रोडवरील प्रभाग १९ मधील विनायकनगरात रस्त्याची दुरवस्था झाली आहे. नागरिकांना पावसाळ्यात चिखलातून मार्ग काढावा लागत आहे. वारंवार मागणी करून रस्त्याचे काम होत नसल्यामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी रास्ता रोको आंदोलन केले.
विनायकनगर गल्ली नं. २ मधील नागरिक गेली वर्षभरापासून ड्रेनेज, रस्त्याची मागणी करीत आहेत. ड्रेनेजचे काम केल्यानंतर रस्त्याची सुधारणा केली नाही. या भागातील नागरिकांनी चारही नगरसेवकांना वारंवार विनंती करूनही याकडे दुर्लक्ष केले गेले. पाऊस सुरू झाल्याने हा रस्ता चिखलमय झाला आहे. संतप्त नागरिक, महिलांनी नगरसेवकांच्या नावाने शंखध्वनी करीत रास्ता रोको आंदोलन केले. शहर अभियंता परमेश्वर हलकुडे यांनी तात्काळ मुरुमीकरण सुरू करण्याची ग्वाही दिल्यानंतर आंदोलन मागे घेण्यात आले.
या आंदोलनात संदीप सकट, प्रकाश पाटील, रमेश हेगार, अतुल नागठाण, संतोष पुकाळे, आकाश चिकोर्डे, झुल्फी मुल्ला, उदय पतंगे, ओंकार पोंक्षे, पप्पू देशमाने, संजय चव्हाण, गजानन लकडे, जयवंत येसादे, मकरंद माळी, रामदास हिंगसे, अक्षय शिंदे, गणेश बिचुकले, ऋषीकेश चव्हाण, प्रसाद मोहिते, मनसूर विसापुरे, शशिकांत पाटील आदी कार्यकर्ते उपस्थित होते.