विकास शहाशिराळा : कोरोना रुग्णांची संख्या सध्या वाढत आहे. यामुळे आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. यामुळे कोरोना प्रतिबंधक लसीसाठी लसीकरण केंद्रांवर विचारणा होत आहे; परंतु लसीचा साठा नसल्याने लाभार्थींना माघारी जावे लागत आहे.कोरोना संपल्याने नागरिकांनी पुढील डोस अथवा बूस्टर डोस घेणे टाळले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात लस वाया गेली. आता पुन्हा कोरोना आल्याने नागरिक लसीची मागणी करीत आहेत.चीनमध्ये कोरोनाबाधितांच्या वाढत्या संख्येने धडकी भरली असतानाच, देशभरात सतर्कतेचे आदेश देण्यात आले होते. त्यावेळी सर्व रुग्णालयांची पाहणीही केली होती.मात्र आता देशात कोरोना पुन्हा पसरत आहे. त्यामुळे पहिला, दुसरा डोस तसेच लसीचे दोन डोस घेतल्यानंतर बूस्टर डोससाठी पात्र असणाऱ्या लाभार्थींसाठी यापूर्वी प्रशासनाने लसीच्या साठ्याची तरतूद केली होती. मात्र, सामान्यांनी त्याकडे पाठ फिरविल्याने लस साठा वाया गेल्या आहेत. ३१ डिसेंबरला पहिला साठा कालबाह्य झाला. त्यानंतर कोरोना नव्हता. त्यामुळे नागरिकांनी त्याकडे पाठ फिरवली तसेच आरोग्य विभागानेही दुर्लक्ष केले.ऑक्सिजन, ऑक्सिमीटर, थर्मल गन, पीपीई किट उपलब्ध करण्यात आले आहेत. आता रुग्णच आपली कोरोना टेस्ट करू नका, असे सांगत आहेत.
घाबरू नका, योग्य काळजी हाच उपायचीनमधील बीएफ ७ हा विषाणू घातक नाही. त्यामुळे सर्वसामान्यांनी घाबरून जाऊ नये. सॅनिटायझरचा वापर, मास्क परिधान करणे, सामाजिक अंतर राखणे या त्रिसूत्रीने संसर्ग टाळणे शक्य आहे. त्यामुळे सामान्यांनी लसीकरण पूर्ण करण्यावर भर द्यावा. - गणेश शिंदे, तहसीलदार, शिराळा
केवळ नियम पाळागर्भवती, सहव्याधीग्रस्त, लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांनी कोरोना संसर्ग टाळण्यासाठी खबरदारी घ्यावी. सार्वजनिक ठिकाणी गर्दीत जाणे टाळायला हवे. कोरोना लाटांच्या नियंत्रणाचाही सक्षम अनुभव आपल्याकडील यंत्रणांकडे आहे, त्यामुळे सामान्यांनी बेफिकीर न राहता केवळ नियम पाळावेत. - डॉ. प्रवीण पाटील, तालुका आरोग्य अधिकारी, शिराळा