लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : गेल्या वर्षभरापासून रस्त्यावरील खड्ड्यांमुळे त्रासलेल्या सांगलीकरांच्या संयमाचा बांध आता सुटत चालला आहे. सांगलीकडे येणाºया महामार्गासोबतच महापालिका हद्दीतील रस्ते खड्ड्यांनी भरलेले आहेत. पालिकेने तर वर्षभरापासून चांगल्या रस्त्यांचे गाजर दाखविण्यातच धन्यता मानली आहे. पण आता नागरिकांतून उत्स्फूर्तपणे खड्डेमुक्तीचा गजर सुरू झाला असून, ऐन दिवाळीत ठिकठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने आंदोलन करून एकप्रकारे इशाराच दिला आहे. पालिकेतील सत्ताधारी व प्रशासनाने वेळीच पावले उचलली नाहीत, तर या संतापाचा उद्रेक होऊ शकतो.सांगली महापालिका आणि खड्डे यांचे नाते गेल्या एक-दोन वर्षांपासून चांगलेच घट्ट झाल्याचे दिसून येते. सध्या शहरातील एकही रस्ता सुस्थितीत नाही. मुख्य रस्त्यांची तर वाट लागली आहे असे म्हटले तर वावगे ठरणार नाही. खड्डेमय रस्त्यांना नेमके कोण जबाबदार? हा चर्चेचा विषय असला तरी, नागरिकांना दिलासा देण्यात पालिकेतील सत्ताधारी, विरोधक आणि प्रशासनातील अधिकारी अपयशीच ठरल्याचे दिसून येते. अगदी महापालिका मुख्यालयासमोरील रस्त्याच्या दुरवस्थेवरून, शहरातील इतर रस्त्यांची काय अवस्था असेल, याचा अंदाज बांधता येईल.रस्त्यांची भयावह परिस्थिती असतानाही नागरिकांनी गेल्या वर्षभरापासून संयम पाळला होता. महापौर, आयुक्तांकडून केवळ रस्त्यांच्या दुरूस्तीचे गाजर दाखविण्यात येत आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्यापासून मुख्य रस्त्यांच्या दुरुस्तीचे आश्वासन नागरिकांना देण्यात आले. आता दोन आठवड्यानंतर पुन्हा नोव्हेंबर महिना आला, तरी रस्त्यांची सुधारणा झालेली नाही. पालिकेने २४ कोटी रुपयांची रस्त्यांची कामे करण्याचा निर्णय घेतला. प्रशासनाच्या लाल फितीच्या कारभारात फायलींचा प्रवास वाढला. उन्हाळ्यात कामे सुरू होतील, या आशेवर असलेल्या नागरिकांना, पावसाळा संपून दिवाळी झाली तरी, खड्ड्यांतूनच प्रवास करावा लागत आहे. तरीही लवकरच कामे सुरू होतील, असे जाहीर आश्वासन महापौर, आयुक्तांकडून दिले जात आहे. इतका निष्काळजीपणा यापूर्वीच्या सत्ताकाळात व प्रशासनात कधीही झालेला नव्हता. पण आता नागरिकांच्या संयमाचा बांध फुटू लागला आहे. दिवाळीसारख्या आनंदाच्या सणातही नागरिकांनी रस्त्यावर उतरून आंदोलन हाती घेतले आहे. सांगली-पेठ रस्त्याबाबत सर्व सामाजिक संघटना एकत्र आल्या. त्याच पद्धतीने महापालिका हद्दीतील खड्डेमुक्तीसाठी जिल्हा सुधार समिती, स्वाभिमानी आघाडीसह नागरिक खड्ड्यांत दिवे लावून प्रशासनाला जाग आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. यातून वेळीच बोध घेऊन खड्डेमुक्त रस्त्यांसाठी हालचाली न केल्यास प्रशासन व सत्ताधाºयांना नागरिकांच्या आणखी रोषाला सामोरे जावे लागेल.शासकीय विश्रामगृह रस्त्याची चर्चामहापालिकेने २४ कोटींची कामे हाती घेतली आहेत; पण ही कामे सुरू करतानाही दुजाभाव केला जात असल्याची चर्चा सोशल मीडियावर सुरू आहे. शहरातील वर्दळीच्या रस्त्यांची कामे हाती घेण्याऐवजी टीव्हीएस शोरूम ते प्राईड सिनेमा या कमी वाहतुकीच्या रस्त्याचे काम सुरू झाल्याने नागरिकांतून उलटसुलट प्रतिक्रिया उमटू लागल्या आहेत. या रस्त्यावर आयुक्तांचा बंगला, मंत्री, आमदारांसाठीचे शासकीय विश्रामगृह आहे. त्यामुळेच आधी या रस्त्याचे काम सुरू केले का? असा सवालही सोशल मीडियातून विचारला जात आहे. महापालिकेच्या दारातील रस्ता खड्ड्यात असताना, त्याला प्राधान्य देण्याऐवजी वर्दळ नसलेल्या रस्त्याचे काम सुरू झाल्याने सामजिक संघटना व नागरिक आंदोलनाच्या पवित्र्यात आहेत.
खड्ड्यांवरून नागरिकांचा संयम सुटतोय!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 22, 2017 11:56 PM