सांगली : पाडव्याच्या मुहूर्तावर कोरोनाची लस टोचून घेण्याची संधी नागरिकांनी दवडली. मंगळवारी दिवसभरात १३ हजार ८३२ लाभार्थींनीच लस टोचून घेतली. आरोग्य विभागाकडे एक-दोन दिवसांपुरतीच लस शिल्लक आहे.
मंगळवारी पाडव्याची शासकीय सुटी असतानाही शासकीय रुग्णालयांत लसीकरण सुरूच ठेवले होते; पण सणाच्या दिवशी लस टोचून घेण्याकडे नागरिकांनी पाठ फिरविली. गेल्या काही दिवसांत कोरोनाचे दररोजचे रुग्ण वाढताहेत, त्यामुळे लस टोचून घेण्यासाठीही गर्दी होत आहे. हे पाहता आरोग्य विभागाने लसीकरण केंद्रांची संख्या वाढविली. आतापर्यंत २२७ केंद्रांवर लस टोचली जात होती, त्यामध्ये जिल्हा परिषदेची आरोग्य उपकेंद्रे वाढविल्याने २५१ केंद्रांवर लसीकरणाची सोय झाली, तरीही दिवसभरात अपेक्षेनुसार लसीकरण झाले नाही.
विशेषत: महापालिका क्षेत्रात लसीकरणाला अजिबात प्रतिसाद मिळाला नाही. सर्व केंद्रांवर लस उपलब्ध असतानाही नागरिक फिरकले नाहीत. महापालिकेच्या १५ आरोग्यवर्धिनी केंद्रांसह शासकीय व खासगी रुग्णालये अशा एकूण ३० केंद्रांवर लसीकरण सुरू आहे, दिवसभरात तेथे अवघ्या एक हजार ४८९ जणांनी लस टोचून घेतली.
दरम्यान, लसीचा साठा संपुष्टात येत असून, अवघे २१ हजार डोस शिल्लक आहेत. ते बुधवारी किंवा गुरुवारी संपतील, तोपर्यंत आणखी पुरवठ्याची अपेक्षा आहे.
चौकट
मंगळवारी दिवसभरातील लसीकरण
एकूण केंद्रे - २५१
ग्रामीण प्राथमिक आरोग्य केंद्रांत- ११ हजार ४४३
निमशहरी भागातील रुग्णालयांत - ९००
महापालिका क्षेत्रात- एक हजार ४८९
एकूण लसीकरण - १३ हजार ८३२
आजवर मिळालेली लस - तीन लाख ७३ हजार डोस
मंगळवारअखेर झालेले लसीकरण - तीन लाख ४१ हजार ७४०
वाया गेलेले डोस- सुमारे दहा हजार
शिल्लक डोस - सुमारे २१ हजार