मणदूर पैकी धनगरवाडा येथील माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी मार्गदर्शन केले. यावेळी गणेश शिंदे, गोविंद लंगुटे, विजय माळवदे, वसंत पाटील उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
शिराळा : वनविभाग, महसूल विभाग, भूमिअभिलेख आणि ग्रामस्थ यांच्या समन्वयातून मणदूरपैकी धनगरवाडा येथील कुटुंबांना लवकरच शेतजमिनी मिळणार असून त्यांच्या नावे स्वतंत्र सातबारा होण्याचे काम अंतिम टप्प्यात आले असल्याची माहिती माजी मंत्री शिवाजीराव नाईक यांनी धनगरवाडा ग्रामस्थांच्या शिष्टमंडळाला दिली.
यावेळी तहसीलदार गणेश शिंदे, वन क्षेत्रपाल गोविंद लंगुटे, भूमिअभिलेखचे विजय माळवदे, सरपंच वसंत पाटील यांची प्रमुख उपस्थित होते.
शिवाजीराव नाईक म्हणाले, १९४१ पासून येथील लोकांचे या ठिकाणी वास्तव्य आहे. मात्र त्यांना कसण्यासाठी हक्काच्या शेतजमिनी नव्हत्या. ग्रामस्थ व शासनाच्या प्रतिनिधींनी सहकार्य करण्याची भूमिका घेतल्याने येथील कुटुंबांना हक्काच्या शेतजमिनी मिळणार आहेत.
तहसीलदार गणेश शिंदे म्हणाले, ज्या जमिनी द्यावयाच्या आहेत त्यातील काही सर्व्हे नंबरमधील तांत्रिक बाबींची तपासणी करून त्या अडचणी लवकरच दूर करण्यात येतील. ३१ मे २०२१ पर्यंत येथील नागरिकांना शासनाकडून आम्ही हक्काच्या शेतजमिनी देण्याचा प्रयत्न करू.
यावेळी प्रकाश पाटील यांच्यासह अधिकारी व नागरिक उपस्थित होते.
चौकट -
हात जोडून विनंती
येथील ९० वर्षीय धोंडिबा डोईफोडे यांनी शासकीय अधिकारी व लोकप्रतिनिधींच्या शिष्टमंडळासमोर हात जोडून विनंती केली की, आमच्या तीन पिढ्या अशिक्षित होत्या, आताची पोरं चार वर्ग शिकलेली आहेत. त्यांच्यामुळे जुनी कागदपत्रे मिळाली आहेत. आपण आता जास्त वेळ न लावता आम्हाला कसायला आमच्या हक्काच्या शेतजमिनी द्या.