पलूस : महापूर येऊन एक महिना उलटून गेला तरीही पलुस तालुक्यातील कृष्णाकाठच्या पूरग्रस्त गावांमधील नागरिक सानुग्रह अनुदान, नुकसानीची भरपाई, धान्य यापासून वंचित आहेत. याला जबाबदार काेण? असा सवाल करत बुधवारी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र वाळवेकर यांच्या नेतृत्वाखाली पूरग्रस्त गावांतील शेतकऱ्यांनी भिलवडी ते पलूस तहसीलदार कार्यालयापर्यंत मोर्चा काढला.
कृष्णाकाठच्या भिलवडी, माळवाडी, ब्रह्मनाळ, सुखवाडी, चोपडेवाडी, खटाव आदी गावांतील पूरग्रस्त नागरिक मोर्चात सहभागी झाले हाेते. वाळवेकर यांनी पूरग्रस्तांच्या शिष्टमंडळासह तहसीलदार निवास ढाणे यांना निवेदन दिले.
वाळवेकर म्हणाले, भिलवडीमध्ये पूरग्रस्त नागरिकांना २०१९ च्या निकषांवर लवकरात लवकर सानुग्रह अनुदान मिळावे. ज्या पूरग्रस्तांना अजून धान्य मिळाले नाही, त्यांना तत्काळ धान्य द्यावे. ज्यांच्या घरांमध्ये पाणी गेले आहे, अशी पूरग्रस्त कुटुंबे अद्याप धान्य मिळण्यापासून वंचित आहेत. त्याच्यामध्ये जर कुणी जाणीवपूर्वक यादीमधील नावे कमी करण्याचा प्रयत्न केला असेल तर त्यांच्यावर कारवाई करावी. मदतकार्यामध्ये पारदर्शकता असावी. महापूर येऊन एक महिना उलटला तरीही सानुग्रह अनुदान मिळालेले नाही. हे अनुदान तुटपुंजे आहे तेसुद्धा लवकर मिळत नाही. हे अनुदान लवकरात लवकर मिळावे.
तहसीलदार निवास ढाणे म्हणाले. सर्व पूरग्रस्तांना अनुदान मिळणार आहे. स्थलांतरित झालेल्यांना व घरामध्ये पाणी गेलेल्यांना सानुग्रह अनुदान देण्यात येईल. ज्यांना धान्य मिळाले नाही अशांची खात्री करून धान्य देण्याची व्यवस्था करणार आहाेत. सानुग्रह अनुदानाची पन्नास टक्के रक्कम आमच्याकडे जमा आहे. उर्वरित रक्कम आल्यानंतर तत्काळ सानुग्रह अनुदानाची रक्कम देऊ.
यावेळी भिलवडीचे ग्रामपंचायत सदस्य चौगोंडा चिंचवडे, किशोर तावदर, प्रकाश चौगुले, ऋषी टकले, पिंटू पुजारी, संजय चौगुले, वसंत ऐतवडे, नवनाथ एजगर, अविनाश भोई, उल्लास ऐतवडे, सुनील पाटील, सचिन पाटील, संकेत चौगुले, सर्वहीत माने, सतीश माने, मुकेश कांबळे आदी उपस्थित होते.
080921\2031-img-20210908-wa0011.jpg
पलूस मोर्चा