लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : श्यामरावनगर आरोग्य केंद्रात मुस्लिम समाजातील नागरिकांनी कोरोनाची लस घेतली. तसेच सर्व समाजबांधवांना लस घेण्याबाबत आवाहन केले. महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांच्या मार्गदर्शनाखाली वैद्यकीय अधिकारी डॉ. शबाना लांडगे यांनी श्यामरावनगर आरोग्य केंद्रात मुस्लिम समाजातील नागरिकांना मार्गदर्शन करून, लसीकरणाबाबतचे गैरसमज दूर केले.
शहरातील प्रभाग १५ व १८ मधील मुस्लिम समाजातील ज्येष्ठ नागरिक आणि मशीद प्रमुखांना डॉ. शबाना लांडगे यांनी कोरोना लसीबाबत मार्गदर्शन केले. तसेच या लसीबाबत असणारे गैरसमज दूर केले. यासाठी नगरसेवक फिरोज पठाण, नसीमा नाईक, रज्जाक नाईक, रवींद्र वळवडे यांनी पुढाकार घेत, सर्व समाजबांधवांमध्ये कोरोना लसीकरणाचे महत्त्व पटवून दिले.
यावेळी पाकीजा मशिदीचे अध्यक्ष निहालअहमद अन्सारी, हाजी मकबूल फकीर, गणीदोस्त महंमद शेख, अफजाल अहमद उस्मानी, मकसूद बागवान, अम्मार मशिदीचे अध्यक्ष रहीमबक्ष बारगीर आदी उपस्थित होते.