सांगली : वीज वितरण कंपनीकडून मंगळवारी दिवसभर शहरातील विद्युत पुरवठा खंडित राहिल्याने त्याचा परिणाम महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागावर झाला. त्यामुळे बुधवारी सकाळी सांगली व कुपवाड शहराला कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा करण्यात आला. सायंकाळनंतर मात्र शहरातील अनेक भागात पाणीपुरवठा सुरळीत करण्यात महापालिकेला यश आले होते. उपनगरांतील नागरिकांचे मात्र ऐन उन्हाळ्यात पाण्यासाठी हाल झाले. काही ठिकाणी महापालिकेने टँकरद्वारे पाणीपुरवठा केला. बुधवारी सकाळी शहरातील गावठाणासह उपनगरांतही पाण्याचा पुरवठा होऊ शकला नाही. मंगळवारी दिवसभर शहरातील विद्युतपुरवठा खंडित होता. त्यामुळे मंगळवारी दिवसभर जॅकवेलजवळील पंप बंद होते. वीज खंडित झाल्याने त्याचा पाणीपुरवठ्यावर परिणाम झाला होता. मंगळवारी रात्रीपासून महापालिकेने पाणी उपसा सुरू केला. पण सकाळपर्यंत पाण्याच्या टाक्या पूर्ण क्षमतेने भरलेल्या नव्हत्या. विशेषत: उपनगरांत होणारा पाणीपुरवठा अपुरा व कमी दाबाने होत होता. यशवंतनगर, वसंतनगर, सह्याद्री हौसिंग सोसायटी, लक्ष्मीनारायण हडको कॉलनी, राजीवनगर या परिसरात सकाळी पाण्याचा पुरवठा होऊ शकला नाही. अहिल्यानगर, प्रकाशनगर परिसरात कमी दाबाने पाणीपुरवठा झाला. या भागात दुपारी तीननंतर पाणीपुरवठा सुरळीत करण्यात महापालिकेला यश आले. शिंदे मळा, आरवाडे पार्क, मयूर हडको कॉलनी या परिसरात गेल्या आठ दिवसांपासून पाण्याची समस्या निर्माण झाली आहे. बुधवारी या भागात पाच टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात आला. शामरावनगर भागातून नागरिकांची पाणी टँकरची मागणी होती. महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडे एकच पाण्याचा टँकर असल्याने, कोणत्या भागाला पाणी द्यायचे, अशी नवी समस्या निर्माण झाली होती. त्यातून अग्निशमन दलाकडील वाहनांची मदत घेण्यात आली. गावठाणात पाणीटंचाईचा फारसा त्रास जाणवला नाही. बुधवारी दुपारनंतर शहरातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यात आला असून, गुरुवारी शहराला पूर्ण क्षमतेने पाणीपुरवठा होईल, असे कार्यकारी अभियंता शरद सागरे यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
सांगलीत पाण्यासाठी नागरिकांची धावाधाव
By admin | Published: April 20, 2017 12:08 AM