विटा : कोरोना संक्रमण रोखण्यासाठी नागरिकांनी शासनाच्या नियमांचे पालन करावे. सुरक्षित अंतर ठेवण्याबरोबरच योग्य ती दक्षताही घेणे महत्त्वाचे आहे. कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे नागरीकांनी स्वत:ला व कुटुंबाला कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी शासन प्रमाणिक कोव्हिशिल्ड लस घ्यावी, असे आवाहन आ. अनिल बाबर यांनी केले.
विटा येथील ग्रामीण रुग्णालयात आमदार अनिल बाबर यांना सपत्नीक कोव्हिशिल्ड लस देण्यात आली. त्यावेळी आ. बाबर यांनी कोव्हिशिल्ड लसीचे कोणतेही दुष्परिणाम नाहीत. त्यामुळे नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता लसीकरण करून घ्यावे, असे सांगितले.
यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे यांनी विटा ग्रामीण रुग्णालयात कोव्हिशिल्ड लसीकरणाला गती आली असून, आतापर्यंत सुमारे दोन हजार पाचशेहून अधिक नागरिकांना ही लस देण्यात आली आहे. ही लस अत्यंत सुरक्षित असून, नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असा सल्ला दिला.
यावेळी तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल लोखंडे, वैद्यकीय अधिकारी डॉ. विशाल नलवडे यांच्यासह पारिचारिका व वैद्यकीय कर्मचारी उपस्थित होते.
फोटो - १८०३२०२१-विटा-कोविड लसीकरण : विटा ग्रामीण रुग्णालयात आ. अनिल बाबर यांना कोव्हिशिल्ड लस टोचण्यात आली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. अविनाश लोखंडे, डॉ. विशाल नलवडे उपस्थित होते.