संजयनगर : संजयनगर येथे महापालिकेचे आरोग्य केंद्र उभारण्यास महासभेची मान्यता मिळाली आहे. या भागात आरोग्य केंद्र व्हावे, यासाठी गेल्या ५ वर्षांपासून प्रयत्न सुरू होते. या आराेग्य केंद्रामुळे परिसरातील नागरिकांची माेठी साेय झाली आहे, असे प्रतिपादन माजी महापाैर कांचन कांबळे यांनी केले.
कांबळे म्हणाल्या, मी महापौर असताना केंद्र शासन व राज्य शासनाच्या निधीतून महापालिका क्षेत्रामध्ये एकूण १० प्राथमिक आरोग्य केंद्रे व १ रुग्णालय मंजूर करण्यात आले होते. संजयनगर भागात प्राथमिक आरोग्य केंद्राचा ठराव मंजूर केला होता; पण जागेचा प्रश्न न्यायप्रविष्ठ झाल्यामुळे हे काम थांबले होते. या आरोग्य केंद्राची निकड व गरज पाहता यासाठी संजयनगर येथील सि.स.नं. ५१६६/२१ ही जागा मी सुचविली. आयुक्तांकडे प्रस्ताव सादर केला. आयुक्त नितीन कापडणीस यांनी या प्रस्तावास मंजुरी दिली. या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र बांधण्यास महासभेची मान्यता मिळाली आहे. या प्राथमिक आरोग्य केंद्रामुळे संजयनगर, अभयनगर, यशवंतनगर, चिंतामणीनगर, शिंदे मळा, अहिल्यानगर, लक्ष्मीनगर, या भागातील गोरगरीब जनतेस लाभ होणार आहे.
यासाठी पालकमंत्री जयंत पाटील, कृषी राज्यमंत्री विश्वजित कदम, युवा नेते विशाल पाटील, काँग्रेस नेत्या जयश्री पाटील, राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, काँगेसचे शहर जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज पाटील, महापौर दिग्विजय सूर्यवंशी, उपमहापौर उमेश पाटील, विरोधी पक्षनेते उत्तम साखळकर, राष्ट्रवादीचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांचे सहकार्य मिळाले.