सांगली : गेल्या वर्षभरापासून ‘स्कूल चले हम...’ असे म्हणत पाठीवर बॅग घेऊन शाळेत जाण्यापासून मुले वंचित राहिली आहेत. कोरोनामुळे सर्वच शाळा कुलूपबंद झाल्या आहेत. कोरोनाचे संकट अजूनही टळलेले नाही. आता तर लहान मुलांना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. या पार्श्वभूमीवर शहरातील नर्सरी व केजीच्या ५ हजार मुलांचे पुढील शैक्षणिक वर्षही घरातच जाणार आहे.
सांगली महापालिका क्षेत्रात नर्सरी व केजीच्या ५०हून अधिक शाळा आहेत. त्यात दरवर्षी साडेचार हजार ते पाच हजार विद्यार्थी प्रवेश घेतात. गेल्या वर्षी मार्चपासून लाॅकडाऊन जाहीर करण्यात आला. त्यामुळे सर्वच शाळा कुलूपबंद झाल्या होत्या. दिवाळीनंतर शाळा सुरू होतील, अशी आशा होती. पण कालांतराने तीही फोल ठरली. केवळ नववी ते बारावीपर्यंतचे वर्ग सुरू झाले. पण नर्सरी, लहान गट, मोठा गटाच्या शाळा मात्र बंदच राहिल्या. त्या आजतागायत बंदच आहेत.
लवकरच यंदाचे शैक्षणिक वर्ष सुरू होत आहे. पण, या शैक्षणिक वर्षातही शाळा सुरू होण्याची शक्यता धुसर आहे. पुढील टप्प्यात लहान मुलांना कोरोना संसर्गाची भीती व्यक्त केली जात आहे. त्यामुळे नर्सरी, केजीच्या शाळा बंदच राहतील. या शाळेत शिक्षण घेणाऱ्या पाच हजार विद्यार्थ्यांना यंदाही ऑनलाईन शिक्षणावर अवलंबून राहावे लागणार आहे.
चौकट
वर्षभर कुलूप, यंदा?
- कोरोनाच्या महामारीमुळे वर्षभर शाळा बंदच आहेत. त्यात शाळांचा दैनंदिन खर्च, शिक्षकांचे पगार सुरू आहेत. हा खर्च भागविणे संस्थाचालकांना कठीण झाले आहे. पालकही फी देण्याबाबत उदासीन आहेत. अशातच यंदाची स्थितीही अजून स्पष्ट नाही. त्यामुळे संस्थांसह मुलांचेही शैक्षणिक नुकसान होत आहे.
- कपिल रजपूत - संस्थाचालक
- कोरोनामुळे शाळा बंद असल्या तरी संस्थेच्यावतीने मुलांना ऑनलाईन शिक्षण दिले जात आहे. ऑनलाईन शिक्षणात काही अडचणी असल्या तरी त्या दूर करून मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात कायम ठेवण्याचे काम केले आहे. - सुशांत शहा, संस्थाचालक
- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वर्षभरापासून शाळा बंद आहेत. पण संस्थेचा खर्च कमी झालेला नाही. त्यात नर्सरी, केजीचाही समावेश आहे. हे संकट लवकर निवळले नाही तर मुलांच्या शैक्षणिक भवितव्यावर परिणाम होऊ शकतो. - विनोद मोहिते, संस्थाचालक
चौकट
मुलांच्या मानसिकतेवरही परिणाम, ही घ्या काळजी
मुले घरातच असल्याने हट्टी, चिडचिडी बनतात. शाळा बंदमुळे त्यांचा सामाजिक, भावनिक विकास खुंटतो. त्यामुळे अशा काळात मोबाईल, टीव्हीपेक्षा पालकांनी मुलांसोबत जास्तीत जास्त वेळ घालविला पाहिजे. त्यांना मानसिक आधार दिला पाहिजे. - डाॅ. पवन गायकवाड, मनसोपचारतज्ज्ञ, सांगली
चौकट
- पालकही परेशान
वर्षभरापासून मुले घरीच आहेत. ऑनलाईन शिक्षण सुरू असले तरी त्यांना मोबाईलचे व्यसन लागण्याची भीती आहे. शिवाय डोळे, आरोग्यावरही परिणामाची चिंता आहे. - स्नेहल खोत
- मुले घरातच असल्याने चिडचिडी बनली आहेत. त्यांच्या आवडीनिवडी आम्ही सांभाळतो. पण शिक्षणाविषयीची चिंता कमी झालेली नाही. त्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये, इतकीच अपेक्षा आहे. - रेखा बोळाज
- कोरोनाच्या पुढच्या टप्प्यात लहान मुलांना संसर्गाची भीती आहे. त्यामुळे मुलांना शाळेत कसे पाठवायचे, शाळा सुरू होणार की नाही, याची काळजी लागली आहे. सध्या तरी आम्ही त्यांच्या आरोग्याला प्राथमिकता दिली आहे. - शीतलकुमार माने
चौकट
शहरातील नर्सरी टू केजीच्या शाळा
२०१८-१९ : ५०
विद्यार्थी संख्या : ३७००
२०१९-२० : ५०
विद्यार्थी संख्या : ४६००
२०२०-२१ : ५०
विद्यार्थी संख्या : ५२००