मिरज : मिरजेत शास्त्री चौकात जिन्नासाब दर्ग्यात गंध चढविण्याच्या कारणावरून दोन गटात जोरदार मारामारी झाली. लोखंडी गज, काठी व दगडांच्या हल्ल्यात नऊ जण जखमी झाले. याप्रकरणी शहर पोलिसांत दोन्ही गटाच्या एकूण १२ जणांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.हाणामारीप्रकरणी यासीन इरफान बारगीर याने तौफिक पिरजादे, शहानवाज पिरजादे, अय्याज इनामदार, मिरासाब इनामदार, तालवली इनामदार व शाबाज इनामदार यांच्याविरुद्ध तक्रार केली आहे, तर शहानवाज पिरजादे याने नोमन पिरजादे, इशरत बारगीर, यासीन बारगीर, एजाज बारगीर, इरफान बारगीर यांच्याविरुद्ध फिर्याद दिली आहे.जिन्नासाब दर्ग्यात कनवाड गावातील काही लोक गंध चढविण्यासाठी आले होते. त्यावेळी गंध चढविण्याच्या कारणावरून व दर्ग्याबाहेर वाहन लावण्याच्या कारणातून दोन गटात वादावादी झाली. नोमान पिरजादे याने शहानवाज पिरजादे व साथीदारांना दर्गा तुमच्या बापाचा आहे काय, इथे यायचे नाही. मी दर्ग्याचा मालक आहे, असे म्हणून शिवीगाळ केली.त्यानंतर शहनवाज पिरजादे याच्यासह सर्वजण घरी जात असताना नोमन पिरजादे व इशरत बारगीर याच्यासह साथीदारांनी त्यांना लाथाबुक्क्यांनी तसेच लोखंडी गज व दगडांनी मारहाण केली. त्यांच्या वाहनांची तोडफोड करून नुकसान केल्याचे शहानवाज पिरजादे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.दर्ग्यात फकीर लोकांना जेवण वाढत असताना तौफिक पिरजादे व त्याच्या साथीदारांनी वाहन लावण्याच्या वादातून लोखंडी गजाने मारहाण करून गंभीर जखमी केल्याचे यासीन बारगीर याने फिर्यादीत म्हटले आहे. दोन गटात हाणामारीत नऊ जण जखमी झाले असून, दोन्ही गटातील बारा जणांविरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
Sangli: मिरजेतील दर्ग्यात गंध चढविण्यावरून दोन गटात हाणामारी, ९ जखमी; १२ जणांविरुद्ध गुन्हा
By ऑनलाइन लोकमत | Published: July 03, 2024 5:01 PM