मिरज : मालगाव (ता. मिरज) येथे जिल्हा परिषद निवडणुकीतील उमेदवाराने आयोजित केलेल्या जेवणावळीत दोन गटांत बाचाबाची व कोयत्याने झालेल्या हल्ल्यात दोघे जखमी झाले. गुरुवारी रात्री अकराच्यादरम्यान ही घटना घडली. मारामारीप्रकरणी तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. अपक्ष उमेदवार कपिल कबाडगे यांनी मतदारांना जेवण देऊन आचारसंहिता भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.जिल्हा परिषदेच्या मालगाव गटाच्या निवडणुकीत काँग्रेस आघाडीच्या उमेदवाराविरुद्ध कपिल कबाडगे यांनी बंडखोरी केली आहे. गुरुवारी रात्री लक्ष्मीनगर येथे मळ्यात कबाडगे यांच्या प्रचारासाठी भोजनाचे आयोजन करण्यात आले होते. उमेदवाराच्या भोजनाला मतदारांनीही चांगली गर्दी केली होती. यावेळी जेवणासाठी आलेल्या बाबासाहेब केरबा कोडलकर (वय २३, रा. लक्ष्मीनगर) व धनाजी सीताराम वाघमोडे (४०, रा. लक्ष्मीनगर, मालगाव) यांच्यात पूर्ववैमनस्यातून भांडण झाले. भांडणाचे पर्यवसान हाणामारीत होऊन बाबासाहेब कोडलकर यांच्या डोके, कपाळ, चेहरा, कान यावर कोयत्याने वार करण्यात आले. हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या बाबासाहेब कोडलकर याने धनाजी वाघमोडे याने कोयत्याने हल्ला केल्याची पोलिसांत फिर्याद दिली आहे. धनाजी वाघमोडे, दादासाहेब कोडलकर, अशोक कोडलकर यांनी निवडणुकीच्या जेवणावळीत झालेल्या बाचाबाचीच्या कारणावरून घरासमोर येऊन काठीने मारहाण केल्याचे पोलिसांत दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. मारामारीप्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटाच्या तिघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे. निवडणूक निरीक्षक व्दारकाप्रसाद बारवाडे यांनी अपक्ष उमेदवार कपिल कबाडगे, त्यांचे समर्थक सुनील कबाडगे यांनी मतदारांना फुकट जेवण देऊन त्यांची मते मिळविण्यासाठी प्रयत्न करीत आचारसंहिता भंग केल्याची फिर्याद पोलिसांत दिली आहे. पोलिसांनी उमेदवार कबाडगे यांच्यासह दोघांविरुध्द आचारसंहिता भंगाचा गुन्हा दाखल केला आहे. जेवणावळीच्या कारणावरून हाणामारीच्या प्रकारामुळे खळबळ उडाली आहे. (वार्ताहर)
मालगावात उमेदवाराच्या जेवणावळीत हाणामारी
By admin | Published: February 17, 2017 11:46 PM