सांगली : बोचरी थंडी... आणि साथीला रविवारच्या हक्काच्या सुट्टीचा खराखुरा लाभ उठवत सांगलीकर रसिकांनी रविवारी संगीत महोत्सवास हजेरी लावत संगीत आणि वादनाचा मनमुराद आनंद लुटला. पंडित भीमसेन जोशी यांचे चिरंजीव श्रीनिवास जोशी यांचे शास्त्रीय गायन आणि कुणाल गुंजाळ यांच्या संतूर वादनाने सांगलीकर रसिकांना मंत्रमुग्ध केले. येथील ‘स्वरवसंत’ संस्थेतर्फे पंडित भीमसेन जोशी संगीत महोत्सवाचे भावे नाट्यमंदिरात रविवारी आयोजन केले होते. गुरुनाथ कोटणीस महाराज, चंद्रशेखर अण्णा केळकर महाराज, झेंडे महाराज यांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. पहिल्या सत्राची सुरुवात पंडित शरद बापट यांच्या शास्त्रीय आणि भक्तिसंगीत गायनाने झाली. त्यांनी राग आहिरभैरव आणि देवगंधार सादर करीत रसिकांची दाद मिळवली. रामावरील अभंगाने त्यांनी सांगता केली. यानंतर शास्त्रीय गायनात अनुजा झोकरकर (इंदोर) यांनी भोपाल तोडी, चारुकेशी रागातील दादरा ‘सैया बिन’ सादर केला. यानंतर यशवंत वैष्णव यांचे एकल तबलावादन झाले. यात त्यांनी तीनताल सादर केला. दुसऱ्या सत्राचा प्रारंभ कुणाल गुंजाळ यांच्या संतूर वादनाने झाला. अजिंक्य जोशी यांचे तबलावादन आणि संतूर वादनाची जुगलबंदी सांगलीकरांनी अनुभवली. महोत्सवाचे खरे आकर्षण ठरले ते पंडित भीमसेन जोशी यांचे चिरंजीव पंडित श्रीनिवास जोशी. त्यांच्या शास्त्रीय गायनाने महोत्सवाची उंची वाढली. त्यांनी गायनाची सुरुवात पुरिया धनाश्री रागाने केली. जिल्हाधिकारी शेखर गायकवाड यांनी भेट देऊन शुभेच्छा दिल्या. सूत्रसंचालन विजय कडणे आणि चित्रा खरे यांनी केले. मिलिंद कुलकर्णी, महेश देसाई, अण्णासाहेब बुगड, गणेश पापळ यांनी संगीत साथ देत रंगत वाढविली. (प्रतिनिधी)
शास्त्रीय गायन आणि वादनाने रसिक मंत्रमुग्ध
By admin | Published: January 10, 2016 11:00 PM