पेठ : तीळगंगा नदीला आलेल्या महापुरामुळे पेठ (ता. वाळवा) येथील विठ्ठल मंदिरात पाणी शिरले हाेते. पूर ओसरल्यानंतर मंदिरात मोठा गाळ साचून राहिल्याने भाविकांची गैरसाेय हाेत होती. ही बाब लक्षात येताच रामोशी समाजाचे नेते मोहनराव मदने यांनी एमएम ग्रुपचे तरुण कार्यकर्ते येथे पाठविले आणि मंदिराची स्वच्छता केली.
पुराच्या पाण्याने मंदिरात माेठ्या प्रमाणात गाळ साचला हाेता. एमएम ग्रुपच्या कार्यकर्त्यांनी सुमारे दोन डंपर भरून गाळ बाहेर काढून टाकला. पूर्ण मंदिर पाण्याने स्वच्छ केले. ग्रामपंचायतीच्या वतीने तीळगंगा पात्राची स्वच्छता करण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. तलाठी नुकसान झालेल्या घरांचे दुकानांचे पंचनामे करीत आहेत. गावात अंदाजे एक कोटीहून अधिक नुकसान झाले आहे. पालकमंत्री जयंत पाटील, आमदार मानसिंगराव नाईक, युवा नेते प्रतीक पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य सम्राट महाडिक, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती जगन्नाथ माळी यांच्यासह लोकप्रतिनिधींनी दाैरे करून नुकसानीची पाहणी केली; परंतु ग्रामस्थ अद्याप शासकीय मदतीच्या प्रतीक्षेत आहेत.