संजय येंगटे ।येलूर : येलूर (ता. वाळवा) येथील वाहतूक संघटनेच्यावतीने एक सामाजिक उपक्रम म्हणून प्रत्येक बुधवारी गावातील बाजारपेठ आणि स्मशानभूमीची स्वच्छता केली जात आहे. या कामासाठी त्यांना ग्रामपंचायतीचेही सहकार्य लाभत आहे.
गावातील टेंपो व गाड्या भाड्याने देणारे मालक-चालक हे सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी दर बुधवारी गावातील मुख्य बाजारपेठ व स्मशानभूमीची स्वच्छता करीत आहेत. याकरिता ग्रामपंचायतीकडून त्यांना झाडू देण्यात आले आहेत. मुख्य बाजारपेठेत अनेक व्यावसायिक, दुकानदार, बँक, दूध संस्था, सहकारी सेवा सोसायटी असल्याने तेथे नेहमी लोकांची गर्दी असते. याच ठिकाणी दर शनिवारी मोठा बाजार भरतो. त्यामुळे येथे कचरा पडलेला असतो. या ठिकाणी घाणीचे साम्राज्य होऊ नये, म्हणून दर शनिवारी रात्री ग्रामपंचायतीच्यावतीने बाजारपेठेची स्वच्छता केली जाते व बुधवारी वाहतूक संघटनेच्यावतीने याच ठिकाणची स्वच्छता केली जात आहे.यावेळी संदीप गायकवाड, संताजी थोरात, सागर गायकवाड, बाबासाहेब कुंभार, महेश पाटील, कपिल चव्हाण, जयदीप पाटील, तानाजी पाटील, सचिन आडके यांनी सहभाग घेतला. शिवाजीनगर भागातील भैरवनाथ मंदिर परिसरात येथील नितीन पाटील हे स्वखर्चाने रस्त्यालगत व पडीक जागेत वाढलेल्या तणावर तणनाशक फवारतात.सुंदर गाव उभारेलअशाच पद्धतीने प्रत्येकाने स्वत:च्या घरासमोरील अंगण व रस्ता स्वच्छ केला, तर स्वच्छ गाव सुंदर गाव होण्यास मदत होईल, असे मत सामाजिक कार्यकर्ते विजय काका पाटील व्यक्त केले.