जगदीश धुळूबुळू / मिरजप्रतिकूल परिस्थितीचा सामना करीत महापालिकेतील सफाई कर्मचारी राजेंद्र आवळे यांनी एमएसडब्ल्यू (मास्टर आॅफ सोशल वर्क) पदवी मिळविली. टिळक महाराष्ट्र विद्यापीठात पदवीसाठी त्यांनी ‘महापालिकेतील कायम सफाई कामगारांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीतील समस्या : एक अभ्यास’ या विषयावर शोधनिबंध सादर केला आहे. शोधनिबंधात त्यांनी सफाई कर्मचारी बांधवांच्या व्यथा मांडल्याबद्दल व कष्टातून पदवी मिळविल्याबद्दल सहकारी सफाई कामगार व त्यांच्या कुटुंबियांनी त्यांच्याबद्दल अभिमान व्यक्त केला. राजेंद्र आवळे सफाई कर्मचारी म्हणून १६ वर्षापासून नोकरीस आहेत. आवळे यांचे आजोबा भाऊ आवळे नगरपालिकेकडे व वडील सदाशिव भाऊ आवळे हेही तत्कालीन मिरज नगरपालिका व नंतर महापालिकेत सफाई कामगार म्हणून काम करीत होते. वडील सदाशिव आवळे पत्नी, चार मुले असा परिवाराचा डोलारा नोकरीव्दारे सांभाळत होते. प्रकृतीच्या त्रासामुळे त्यांच्यावर ही नोकरी सोडण्याची वेळ आली. मात्र घरची परिस्थिती बेताची असल्याने संसाराचा गाडा हाकण्यासाठी नोकरीची गरज होती. पयार्याने राजेंद्र यांच्यावर घरची जबाबदारी येऊन पडली. वाणिज्य शास्त्रातील पदवीधर असलेल्या राजेंद्र यांनी वडिलांनी स्वेच्छानिवृत्ती घेतल्यानंतर सफाई कर्मचाऱ्याची नोकरी पत्करली. रुग्णालयात परिचारक व वृत्तपत्र विक्रीचे काम करीत बी. कॉम. पदवी पूर्ण केली. आई, वडील, दोन भाऊ, पत्नी, दोन मुले असा संसाराचा व्याप व महापालिकेतील नोकरी सांभाळत त्यांनी शिक्षणात खंड पडू दिला नाही. सफाई कामगाराच्या कुटुंबातील तीन पिढ्यांचे दुष्टचक्र संपविण्यासाठी त्यांनी जिद्दीने शिक्षण सुरू ठेवले. त्यांनी सेवाभावी संस्थांशी संबंधित एलएसजीडी, एलजीएस, डीएलजीएफएम हे पदविका अभ्याक्रमही पूर्ण केले आहेत. शिक्षणात सातत्य ठेवून त्यांनी आता टिळक महाराष्ट्र विद्यापीठातून एमएसडब्लू ही पदवी प्राप्त केली. या पदवीसाठी त्यांनी सादर केलेल्या शोधनिबंधात आपल्या वर्गाचे दु:ख मांडण्याचा प्रयत्न केला आहे. ‘महापालिकेच्या कायम सफाई कर्मचाऱ्यांच्या आर्थिक व सामाजिक प्रगतीतील समस्या : एक अभ्यास’ याविषयी त्यांनी निबंध सादर केला आहे.
सफाई कर्मचारी झाला ‘एमएसडब्ल्यू’
By admin | Published: July 13, 2014 12:59 AM