लोकमत न्यूज नेटवर्कसांगली : केंद्र शासनाच्या स्वच्छता व पेयजल मंत्रालयाने ‘स्वच्छता दर्पण’ अंतर्गत केलेल्या गुणांकनामध्ये सांगली जिल्ह्याने शंभर पैकी ९० गुण घेऊन देशात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. १०० पैकी ९० गुण मिळविणारे देशातील १७ जिल्हे असल्याचेही प्रशासनाकडून सांगण्यात आले. आॅनलाईन माहिती भरण्याची प्रक्रिया दि. २५ सप्टेंबरपर्यंत रात्री १२ वाजेपर्यंत चालणार असून, अंतिम विजेत्या जिल्ह्याचा दि. २ आॅक्टोबरला गौरव होणार आहे.केंद्र शासनाच्या स्वच्छता व पेयजल मंत्रालयाच्यावतीने स्वच्छता दर्पण अंतर्गत गुणांकन करण्यात येत आहे.
त्यामध्ये जो जिल्हा शंभर टक्के शौचालययुक्त आहे, त्या जिल्ह्याने शौचालये किती बांधली, त्याचे सामाजिक लेखापरीक्षण झाले आहे का?, शौचालयाचा वापर, सांडपाणी आणि घनकचरा व्यवस्थापनाबाबत जिल्हा परिषद स्वच्छता कक्षाकडून किती जनजागृती झाली, शौचालय बांधकामाची किती छायाचित्रे आॅनलाईन स्वच्छता दर्पण संकेतस्थळावर अपलोड केली आहेत. प्रत्येक जिल्ह्याला काम होईल, तशी माहिती आॅनलाईन रोज भरावी लागणार आहे. या सर्व कामाचे मूल्यमापन करून स्वच्छता दर्पणमध्ये प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळविणाºया जिल्ह्यांचा देशपातळीवर दि. २ आॅक्टोबर रोजी गौरव होणार आहे.
स्वच्छता दर्पण आॅनलाईन गुणांकनामध्ये सांगली जिल्ह्याने प्रथम क्रमांक पटकाविला आहे. १०० पैकी ९० गुण त्यांनी मिळविले आहेत. सांगली जिल्ह्यातील ६९९ गावांमध्ये शंभर टक्के शौचालये असल्याचा दावा जिल्हा प्रशासनाने केला आहे. यामुळे प्रथम क्रमांकावर दि. २५ सप्टेंबरपर्यंत सांगली जिल्हा देशपातळीवर टिकून राहील, अशी अपेक्षा जिल्हा प्रशासनाने व्यक्त केली आहे.
या स्पर्धेत गुजरात राज्यातील दोन, हरियाणा, पंजाब, पश्चिम बंगाल, हिमाचल प्रदेश, मिझोराम राज्यातील प्रत्येकी एक जिल्हा, सिक्कीम राज्यातील चार जिल्ह्यांनीही १०० पैकी ९० गुण मिळवून प्रथम क्रमांक मिळविला आहे. देशातील १७ जिल्ह्यांनी समान गुण मिळविल्यामुळे ते प्रथम क्रमांकाच्या स्पर्धेत असून, तो टिकविणेही त्यांच्यासमोर आव्हान आहे. स्वच्छता दर्पण गुणांकनामधील प्रथम क्रमांक टिकविण्यासाठी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी अभिजित राऊत, उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी रविकांत अडसूळ आणि त्यांचे कर्मचारी प्रयत्न करीत आहेत.या स्पर्धेत सातारा जिल्हाही असून, १०० पैकी ८९.९९ गुण मिळवून दुसºया क्रमांकावर आहे. ०.१ ने जिल्हा मागे असून, कोणत्याही क्षणी प्रथम क्रमांकाच्या यादीत पोहोचणार आहे.क्रमांक टिकविण्यासाठी प्रयत्न : दीपाली पाटीलस्वच्छता दर्पण आॅनलाईन माहिती भरण्याच्या गुणांकनामध्ये देशात सांगलीचा सलग तीनवेळा प्रथम क्रमांक टिकून राहिला आहे. गुणांकनचे संकेतस्थळ दि. २५ सप्टेंबरला रात्री १२ वाजता बंद होणार आहे. या दिवशीचे गुणांकन महत्त्वाचे आहे. सांगली जिल्हा देशाच्या गुणांकनमध्ये प्रथम ठेवण्यासाठी आमचा प्रयत्न चालू आहे, असा विश्वास जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी दीपाली पाटील यांनी व्यक्त केला आहे.