सांगली : स्वच्छतेचा, हागणदारी मुक्तीचा डंका देशभर पिटणाºया सांगली, मिरज, कुपवाड महापालिकेचा अस्वच्छ चेहरा समोर आला आहे. महापालिकेच्या मुख्यालयातच महिलांच्या स्वच्छतागृहाची प्रचंड दुरवस्था झाली असून, शौचालय दुरुस्तीसाठी लाखो रुपयांच्या खर्चाच्या कामाची फाईल गेली कुठे?, असा प्रश्न निर्माण झाला आहे.महापालिकेच्या मुख्यालयातच महिलांच्या स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. सर्वत्र अस्वच्छता, खिडक्यांच्या काचा फुटलेल्या, समोरच न्यायालयाची इमारत, अशा स्थितीतील स्वच्छतागृहामुळे महिलांची गैरसोय होत आहे. महापालिका आयुक्तांनी हागणदारीमुक्ती अभियान राबविले. यासाठी रात्रीचा दिवस करुन लोकांत जागृती केली. ४४ ठिकाणी सार्वजनिक स्वच्छतागृहे उभारण्यासाठी शासनाकडून निधीही मंजूर झाला. यासाठी नगरसेविका रोहिणी पाटील यांच्यासह काही महिला सदस्यांनी पुढाकार घेतला. बाजारपेठा, गर्दीच्या ठिकाणी महिलांसाठी स्वच्छतागृहे उभारण्याची निविदा प्रक्रियाही पूर्ण केली आहे. महिला स्वच्छतागृहे लवकरच उभी केली जाणार असल्याचे आयुक्त रवींद्र खेबूडकर वारंवार सांगत आहेत.मात्र खुद्द महापालिकेतील स्वच्छतागृहाच्या दुरवस्थेबाबत सर्वांचेच दुर्लक्ष झाले आहे. याबाबत महिला सदस्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. महापालिकेत महिलांसाठी एक स्वतंत्र स्वच्छतागृह आहे. त्याठिकाणी फारसे कुणी जात नाही. महिला व बालकल्याण समितीच्या कार्यालयातील स्वच्छतागृहाची दुरवस्था झाली आहे. या कार्यालयात अनेक महिला सदस्या, महिला कर्मचारी कामासाठी येत असतात. त्या या स्वच्छतागृहाचा वापर करीत असतात. पण दुरवस्थेमुळे त्यांची गैरसोय होत आहे. याच्या दुरुस्तीसाठी तत्कालिन नगरअभियंता आर. पी. जाधव यांनी सुमारे दीड-दोन लाखाची फाईल बनवली होती. त्याबाबत पुढे काय झाले, याची माहिती कोणालाही नाही.पाण्याची सोय नाही : नागरिकांच्या तक्रारीमहापालिकेतील आयुक्त कार्यालय सोडले, तर एकाही कार्यालयात शुद्ध पाण्याची सोय नाही. महापौरांच्या कार्यालयात शुद्ध पाण्याची यंत्रणा होती, पण ती बंद पडली. कामासाठी दररोज नागरिक महापालिकेत येत असतात. त्यांना पिण्यासाठीही शुध्द पाणी दिले जात नाही. टाकीतील पाणी पाजले जाते. मिरजेतील पदाधिकारी, अधिकारी सांगलीत मुख्यालयात येताना मिनरल पाण्याच्या बाटल्या घेऊन येताना दिसतात. महापालिकेत प्रत्येक कार्यालयात किंवा मध्यभागी शुद्ध पाण्याची यंत्रणा बसवावी, अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
स्वच्छतेचा डंका पिटणार्या महापालिकेतच अस्वच्छता
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 22, 2017 12:20 AM