सांगली : सातबारा उताऱ्यावरील कूळ कायदा कलम कमी करून देण्याच्या मोबदल्यात १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना कडेगाव तहसील कार्यालयातील वरिष्ठ लिपिकाला रंगेहाथ पकडण्यात आले. सुनील दादासाहेब चव्हाण (वय ४९, रा. अण्णाभाऊ साठे नगर, इस्लामपूर) असे लिपिकाचे नाव असून, लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तहसील कार्यालयातच सापळा लावून ही कारवाई केली.
तक्रारदाराने शेतजमिनीतून जाण्यासाठी गाडी रस्ता मंजूर करण्यासाठी कडेगाव तहसील कार्यालयाकडे अर्ज केला होता. यावर तहसील कार्यालयात सुनावणी सुरू होती. तक्रारदाराच्या शेतजमिनीच्या सात-बारा उताऱ्यावरील कूळ कायदा कमी करण्यासाठी त्यांनी अर्ज केला होता. यावेळी अव्वल कारकून चव्हाण याने त्यांच्याकडे १५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली होती. यानंतर तक्रारदाराने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे अर्ज करून तक्रार केली होती. ‘लाचलुचपत’कडून केलेल्या पडताळणीत लाच मागितल्याचे निष्पन्न झाले होते. यात १५ हजार रुपयांची मागणी करून चर्चेअंती १० हजार रुपयांची मागणी केली होती.
मंगळवारी तहसील कार्यालयात चव्हाण याने तक्रारदाराकडून १० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडण्यात आले. चव्हाण याच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक अधिनियमाखाली गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया रात्री उशिरापर्यंत सुरू होती.उपअधीक्षक सुजय घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विनायक भिलारे, दत्तात्रय पुजारी, अविनाश सागर, संजय संकपाळ आदींच्या पथकाने ही कारवाई केली.
चव्हाण दुसऱ्यांदा जाळ्यात
कडेगाव येथे लाच घेताना पकडण्यात आलेला चव्हाण याच्यावर यापूर्वीही ३० हजार रुपयांची लाच घेताना कारवाई झाली होती. २०२० मध्ये तक्रारदाराच्या आजीच्या निधनानंतर तिच्या मृत्यूपत्रकाची नोंद करण्यासाठी त्यावेळी वाळवा येथे मंडल अधिकारी म्हणून कार्यरत असलेल्या चव्हाणने ७० हजार रुपये लाचेची मागणी केली होती. चर्चेअंती ६० हजार रुपये ठरवून त्यापैकी ३० हजार रुपये स्वीकारताना चव्हाण व त्याच्या एजंटाला रंगेहात पकडण्यात आले होते.