दरीबडची : संख (ता. जत) येथील सरकारमान्य देशी दारू दुकान, बिअरबार मुंबई दारूबंदी कायदा १९४९ प्रमाणे कायमस्वरूपी बंद करण्यात यावेत, अशी मागणी महिला ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे जिल्हाधिकारी दीपेंद्रसिंह कुशवाह यांच्याकडे केली आहे.निवेदनात म्हटले आहे की, पूर्व भागातील संख येथे एक सरकारमान्य देशी दारू दुकान व दोन बिअरबार आहेत. गावात सहजासहजी दारू मिळत असल्यामुळे तरुण मुले, शेतमजूर, ऊसतोडणी मजूर, कामगार, मध्यमवर्गीय सर्वसामान्य ग्रामस्थांमध्ये व्यसनाधिनतेचे प्रमाण अधिक आहे. अनेकांचे प्रपंच उद्ध्वस्त झाले आहेत. व्यसनी लोकांमुळे मारामारीचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे गावातील सार्वजनिक कार्यक्रमात अडथळे येत आहेत, वातावरण कलुषित होत आहे.गावातील दारू दुकान, बिअरबार व व्यसनाधीनतेचा महिलांना अधिक त्रास सहन करावा लागत आहे. मुले व मुलींनाही त्रास होत आहे. तरी मुंबई दारूबंदी कायदा १९४९ प्रमाणे देशी दारू दुकान, बिअरबार दुकान कायमस्वरूपी बंद करण्यात यावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. निवेदनावर ५८३ महिलांसह स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे युवा आघाडी अध्यक्ष राजू पुजारी, पूर्व विभागप्रमुख चंद्रशेखर रेबगोंड, संख अध्यक्ष नागनाथ शिळीन, विश्वनाथ बिरादार, शरणाप्पा शिळीन, शिवानंद पाटील, सरपंच गौरम्मा शिरमगोंड, ग्रा. पं. सदस्या काशीबाई टोणे, अन्नपूर्णा शिळीन, निर्मला अंकलगी, इंद्राबाई रेबगोंड, मल्लमा बिरादार, शकुंतला कांबळे यांच्या सह्या आहेत. (वार्ताहर)
देशी दारू दुकान, बिअरबार बंद करा
By admin | Published: July 20, 2014 11:38 PM