सांगली : कोरोना विषाणूचा संसर्ग रोखण्यासाठी संचारबंदी आदेश लागू असतानाही त्याचे नागरिकांकडून उल्लंघन होत असल्याने शुक्रवारी पोलीस प्रशासनाने सांगली शहरातील प्रमुख मार्गांना जोडणारे रस्ते सील केले आहेत. नाकाबंदीवेळी विनाकारण फिरणार्या वाहनचालकांवर कारवाईसाठी हा मार्ग अवलंबविण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रार्दूभाव वाढू नये यासाठी प्रशासनाच्यावतीने संपूर्ण संचारबंदीचे आदेश लागू केेले आहेत. त्यात केंद्र सरकारने ३ मेपर्यंत लॉकडाऊन वाढविला आहे. या कालावधीत अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व वाहतूक बंद असलीतरी अनेक वाहनचालक विनाकारण रस्त्यावर फिरताना दिसत आहेत. यामुळे गर्दी होत असून संसर्ग रोखण्यासाठी आता पोलीस प्रशासनाने कडक पावले उचलण्यास सुरूवात केली आहे.
त्यानुसार गुरूवारी संजयनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंगळवार बाजार रोडसह इतर रस्ते सील करण्यात आले होते. शुक्रवारी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रस्ते बॅरेकेटस लावून बंद करण्यात आली आहेत. त्यानुसार खणभागातील पंचमुखी मारूती रोडवरील वाहतूक सुरू असून लोकशाहीर आण्णाभाऊ साठे कमानीपासून येणारी वाहतूक बंद करण्यात आली आहे. याशिवाय या मार्गाना जोडणोरे उपरस्ते बांबू लावून बंद केले आहेत.
गावभागातील नागरिकांना येण्यासाठी प्रशिक चौकातील मार्ग खुला ठेवून इतर सर्व उपरस्ते बंद करण्यात आले आहेत. यासह शामरावनगर, हनुमाननगर, नवीन वसाहत परिसरातील रस्तेही बंद करण्याचे नियोजन आहे. शहरात अचानक रस्ते बांबू लावून, बॅरेकॅटस लावून बंद केली जात असल्याने चर्चा सुरू झाली होती मात्र, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी व विनाकारण फिरणार्या वाहनचालकांवर कारवाईसाठीच ही मोहिम सुरू केल्याचे प्रशासनाच्यावतीने स्पष्ट करण्यात आले. एकाच भागाला जोडणारे दोन रस्ते असल्यास एकाच मार्गाचा वापर होणार असल्याने नाकाबंदीवेळी विनाकारण फिरणार्या वाहनचालकांवर कारवाईसाठी हा उपाय प्रभावी ठरणार असल्याचे अधिकार्यांनी सांगितले.