वांगी : गेल्या २० वर्षांपासून मी राज्यात मंत्री म्हणून काम करीत असल्यामुळे स्थानिक पातळीवरील निवडणुकीत भाग घेत नव्हतो. मात्र आता स्थानिक पातळीवरील निवडणुकीत स्वत: लक्ष देऊन पक्षांतर्गत असणारे सर्व गट-तट मोडीत काढणार आहे. गटबाजीमुळे काही गावात मताधिक्य कमी पडले, त्याची गंभीर दखल घेतली जाईल. कोणाला पक्षातून बाहेर जायचे आहे, त्यांनी खुशाल जावे. मात्र, यापुढील काळात जिरवा-जिरवीचे राजकारण चालू देणार नाही, असा सज्जड दम आमदार डॉ. पतंगराव कदम यांनी दिला. वांगी (कडेगाव) येथील सोनहिरा साखर कारखान्यासमोर आज आभार मेळव्यात आ. कदम बोलत होते. यावेळी सांगली जिल्हा कॉँग्रेसचे अध्यक्ष मोहनराव कदम, युवक कॉँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, कडेगाव तालुका कॉँग्रेसच्या अध्यक्षा सौ. मालन मोहिते, सांगली युवक कॉँग्रेसचे जिल्हाध्यक्ष इंद्रजित साळुंखे, सांगली शहर कॉँग्रसचे अध्यक्ष पृथ्वीराज पाटील, प्रतापशेठ साळुंखे, बाळासाहेब गुरव, महेंद्रआप्पा लाड, विटा नगरपरिषदेचे नगराध्यक्ष नंदकुमार पाटील, बाळासाहेब पाटील, जितेश कदम, भीमराव मोहिते उपस्थित होते.यावेळी आ. डॉ. पतंगराव कदम म्हणाले की, पलूस-कडेगाव मतदारसंघातील जनतेने भाजपची लाट जुगारून मला निवडून देऊन, मी केलेल्या विकास कामांची पोहोचपावती दिली आहे. राज्यात सत्ता विरोधकांची असली तरी विकास कामात कुठेही कमी पडणार नाही. प्रत्येक गावा-गावात कॉँग्रेसचे दोन गट पडले आहेत व जिरवा-जिरवीचे राजकारण सुरू आहे. जिरवा-जिरवीमुळे काही गावात मताधिक्य घटले आहे. येथून पुढील काळात जिरवा-जिरवीचे धंदे चालू देणार नाही. जिल्ह्यातील कॉँगे्रसला बळकटी आणणार आहे. ज्यांना पक्षात थांबावयाचे नाही, त्यांनी खुशाल पक्षातून बाहेर पडावे. या निवडणुकीत जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी माझ्याविरोधात काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून देणार आहे. राज्यात सरकार बदलल्यामुळे काही मंडळी ताकद दाखविण्याची भाषा करीत आहेत. त्यांनाही आम्ही जशास तसे उत्तर देणार आहोत. प्रत्येक आठवड्याला तालुक्याच्या ठिकाणी येऊन जनतेचे प्रश्न सोडविणार आहे, असेही आ. डॉ. पतंगराव कदम यावेळी म्हणाले.डॉ. विश्वजित कदम, सौ. मालन मोहिते, अॅड. आत्माराम मदने, सत्यजित देशमुख, व्यंकटराव पवार, डॉ. पृथ्वीराज चव्हाण, भीमराव मोहिते, रामचंद्र पाटणकर यांची भाषणे झाली. यावेळी जि. प. सदस्य सुरेश मोहिते, वैभव गायकवाड, सभापती लता महाडिक, उपसभापती विठ्ठल मुळीक, सखाराम सूर्यवंशी, आकांक्षा तांबेवाघ, शांताराम कदम, बाबासाहेब सूर्यवंशी, धनाजी सूर्यवंशी, नाथाजी मोहिते, प्रकाश जाधव, संभाजी जगताप, बाजीराव पवार, युवराज कदम, अशोक महाडिक, सुनील जगदाळे, पी. सी. जाधव, बापूसाहेब पाटील, आनंदराव पाटील उपस्थित होते. (वार्ताहर)...तर जशास तसे उत्तर पतंगराव कदम पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इशारा देताना म्हणाले की, स्थानिक पातळीवरील सर्व निवडणुकीत लक्ष घालणार असून पक्षाला बळकटी आणणार आहे. ज्यांना पक्षात थांबावयाचे नाही, त्यांनी खुशाल पक्षातून बाहेर पडावे. या निवडणुकीत जिल्ह्यातील काही नेतेमंडळींनी माझ्याविरोधात काम करण्याचा प्रयत्न केला आहे. त्यांना त्यांची जागा दाखवून देईन. सत्तापालटामुळे काही मंडळी ताकद दाखविण्याची भाषा करीत आहेत. त्यांनाही जशास तसे उत्तर देऊ.
जिरवा-जिरवीचे राजकारण बंद करा
By admin | Published: November 04, 2014 10:04 PM