सांगली : शिक्षक बँकेतील सत्ताधाऱ्यांनी खाण्याच्या वाटा बंद केल्या, तर सभासदांना कर्जाचा व्याजदर एक अंकी व लाभांश दोन अंकी सहज देता येऊ शकतो, असा हल्लाबोल विरोधी गटाच्यावतीने संचालक विनायक शिंदे, पोपटराव सूर्यवंशी व अविनाश गुरव यांनी पत्रकार बैठकीत केला.
बँकेची ऑनलाईन सर्वसाधारण सभा रविवार,दि. २१ मार्च रोजी होत आहे. या पार्श्वभूमीवर विरोधी स्वाभिमानी पॅनेलच्यावतीने पार्लमेंटरी बोर्ड अध्यक्ष सूर्यवंशी, शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष व संचालक विनायक शिंदे, अविनाश गुरव, शशिकांत माणगावे, श्यामगोंडा पाटील आदींनी पत्रकार बैठकीत भूमिका मांडली.
शिंदे म्हणाले की, सभासदांना प्रश्न विचारण्याची मुदत १४ मार्चपर्यंत दिली असून, अहवाल १७ मार्चला ऑनलाईन पाठवण्यात आले आहेत. सभासदांना अहवालातून कारभार कळू नये व सभासदांनी प्रश्नच विचारू नयेत, या हेतूने पूर्वनियोजितपणे हा डाव केला आहे.
ठेवीचे व्याजदर हे जास्तीत जास्त ६.७५ टक्केपर्यंत असताना, कर्जाचा व्याज दर मात्र १३.५० टक्केपर्यंत आहे. कमी मागणी असणाऱ्या कर्जाला मात्र नाममात्र ११.५० टक्के इतका व्याजदर करून सभासदांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. ठेवीचा दर व कर्जाचा व्याजदर यातील तफावत पाहता, सात टक्के इतकी प्रचंड आहे. यामागचे गौडबंगाल काय? असा सवाल उपस्थित केला आहे.
अविनाश गुरव म्हणाले, मागीलवर्षी ७० कोटींच्या ठेवी वाढल्या आहेत व कर्ज मात्र ३५ कोटींनी वाढले आहे. म्हणूनच सभासदांची मागणी नसताना कायम ठेव परत करण्याचा घाट सत्ताधाऱ्यांनी घातला असून, हा बँकेला दिवाळखोरीकडे नेण्याचा उद्योग आहे. ठेवी परत देण्यापेक्षा शेअर्सचे अधिकचे पैसे परत करा, वर्गणी मागणी बंद करा. मृत फंड मोठ्या प्रमाणात असतानाही जुनी पेन्शनधारकांना कमी मदत जाहीर केली आहे, असाही आरोप केला.
पोपट सूर्यवंशी म्हणाले, बँकेची प्रगती साधण्यासाठी सभासद संख्या वाढवली, असे सांगणार्या सत्ताधार्यांनी सभासद संख्या वाढवूनही बँकेच्या प्रगतीचा आलेख अधोगतीकडे का? याचे उत्तर द्यावे.
चौकट
विरोधकांचे आक्षेप
- ठेव व कर्जाच्या दरात मोठी तफावत कशासाठी
- बँक संगणकीकृत तरीही स्टेशनरीवर लाखो रुपयांचा खर्च कशासाठी
- देखभाल दुरूस्तीपोटी दोन वर्षांचा आगाऊ अॅडव्हान्स कशासाठी
- इतर खर्च खात्यातील सव्वादोन कोटींचा इतर खर्च कसला?
- नफ्याइतकाच इतर खर्च करण्यामागचे गौडबंगाल काय?