मिरज : मिरजेतील ऐतिहासिक लक्ष्मी मार्केट इमारतीच्या टाॅवरवरील बंद पडलेले घड्याळ मिरजेतील सामाजिक कार्यकर्ते गणेश तोडकर यांनी स्वखर्चाने सुरू केले. महापालिकेच्या वर्धापनदिनी महापाैरांच्या उपस्थितीत ८८ वर्षे जुन्या घड्याळाचे लोकार्पण पार पडले. ऐतिहासिक घड्याळाचे टोल दर तासाला पुन्हा ऐकू येत आहेत.
मिरजेमधील लक्ष्मी मार्केट इमारतीस २८ फेब्रुवारी रोजी ८८ वर्षे पूर्ण होत आहेत. ९ ऑगस्ट १९३० रोजी या इमारतीची पायाभरणी तत्कालीन मिरज संस्थानचे प्रमुख श्रीमंत गंगाधरराव बाळासाहेब यांनी केली. दोन वर्षांनी फेब्रुवारी १९३२ मध्ये या वास्तूचे उद्घाटन सांगली संस्थानचे प्रमुख श्रीमंत चिंतामणराव आप्पासाहेब यांनी केले. या वास्तूचे संवर्धन व देखभाल होत नसल्याने या ऐतिहासिक इमारतीची दुरवस्था झाली आहे. लक्ष्मी मार्केट इमारतीवरील चारही बाजूंनी दिसणारे व तासाला टोल देणारे पुरातन घड्याळ हे गेली १५ वर्षे बंद पडले होते. लक्ष्मी मार्केट इमारतीचे नूतनीकरण, रंगरंगोटी व संवर्धनासाठी सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका प्रशासनाकडे पाठपुरावा केला. मात्र त्यास प्रतिसाद मिळत नसल्याने सामाजिक कार्यकर्ते गणेश तोडकर यांनी स्वखर्चाने इमारतीचे सुशोभिकरण व रंगरंगोटी करण्याची तयारी दर्शविली. दोन वर्षांपूर्वी महापालिकेने परवानगी दिल्यानंतर गणेश तोडकर यांनी बंद घड्याळाच्या दुरुस्तीसाठी प्रयत्न सुरू केले. १९३२ मधील इंडियन क्लाॅक कंपनीचे हे स्प्रिंगचे घड्याळ देखभालीअभावी वाईट अवस्थेत होते. अशा पद्धतीच्या जुन्या घड्याळ दुरुस्ती कारागीरांचा पुणे व हैदराबाद येथे शोध घेण्यात आला. या कारागीरांनी मिरजेत येऊन पाहणी केली. घड्याळाचे खराब झालेले भाग मिळणेही कठीण होते. तोडकर यांनी वर्षभर प्रयत्न करून स्थानिक कारागीरांच्या मदतीने सुटे भाग तयार करून घड्याळ सुरू करण्यात यश मिळविले. घड्याळाच्या सुरक्षेसाठी शटर व सीसीटीव्ही बसविण्यात आले आहेत. तोडकर यांनी गेल्या वर्षभरात इमारतीचे सुशोभिकरण व घड्याळाच्या दुरुस्तीसाठी सुमारे तीन लाख रुपये खर्च केले आहेत. मिरजेची अस्मिता असलेल्या मार्केट इमारतीवरील घड्याळ यापुढे कायम सुरू ठेवण्याची व्यवस्था महापालिकेने करावी, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
लक्ष्मी मार्केटच्या ८९ व्या वर्धापनदिनी रविवारी या वास्तूवरील ऐतिहासिक घड्याळाचे लोकार्पण करण्यात आले. यावेळी महापाैर दिग्विजय सूर्यवंशी, उपायुक्त स्मृती पाटील, नगरसेवक निरंजन आवटी, करण जामदार, योगेंद्र थोरात, नगरसेविका नर्गीस सय्यद यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
काेट
लक्ष्मी मार्केटवरील घड्याळ चालू व्हावे, अशी मिरजकरांची अनेक वर्षांची इच्छा होती. गणेशोत्सव मंडळांनीही सजीव देखावे करून हे घड्याळ सुरू करण्याची मागणी केली होती. काहीवेळा सुरू केलेले घड्याळ कालांतराने परत बंद पडले. आता सुरू झालेल्या घड्याळाची देखभाल करून ते कायम सुरू राहील, याची दक्षता आवश्यक आहे.
- गणेश तोडकर. सामाजिक कार्यकर्ते