अमोल शिंदे --एरंडोलीपाणीपट्टी भरूनही शेतकऱ्यांच्या बांधापर्यंत पाणी येत नाही. बेडगमधील शेतकऱ्यांवर गुन्हा दाखल झाला. कळंबी कालव्यास आवर्तन सुरू होऊनही महिना झाला तरी, पाणी सोडले नाही. थोडे पाणी आले तेही अत्यंत कमी दाबाने येत असल्याने ते एक दोनवेळा एरंडोलीपर्यंत तोंड दाखवून लगेच परतले. मालगावला पाणी गेलेच नाही. तर मल्लेवाडी व एरंडोलीचा नुसता कालवाच भिजला असून, शेतात पाणी गेलेच नाही. शेतकरी अडथळा आणतात, असे कारण सांगत, कळंबी कालव्याचे पाणी सुरू होण्याआधीच बंद करून अधिकाऱ्यांनी काय साध्य केले, असा सवाल येथील शेतकरी करीत आहेत. या योजनेचे कारभारी असणारे अधिकारी स्वत:ला योजनेचे मालक समजू लागले आहेत व त्यांना लोकांतून निवडून गेलेले प्रतिनिधी साथ देत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.कळंबी कालवा पाणी वाटप नियोजन करण्यासठी नुकतीच वारणाली कार्यालयात खासदार संजयकाका पाटील, आमदार सुरेश खाडे यांच्या उपस्थितीत बैठक झाली. पण या बैठकीला बेडग, मल्लेवाडी, एरंडोली, मालगाव या गावातील सरपंच उपस्थित नव्हते. तसेच जिल्हा परिषद सदस्य पंचायत समिती सदस्यही उपस्थित नव्हते. बैठका व समिती निर्माण करण्याची गरज गेल्या दहा वर्षांत पडली नाही, पण यावर्षीच ही परिस्थिती का निर्माण झाली, असा सवालही येथे उपस्थित केला जात आहे.यावर्षीचे म्हैसाळचे आवर्तन ऐतिहासिक ठरत आहे. पहिल्यांदा शेतकरी पाणीपट्टी भरत नाहीत, तोवर पाणी नाही, या भूमिकेने ज्वारी, गहू, उसाचा खोडवा ही पिके शेतात करपून गेली. आता पाणी वाटपातील गोंधळात द्राक्षबागांचा बळी जाणार, असे चित्र आहे. सरकार व प्रशासन यांची गट्टी जमली आहे. शेवटी राजकारणात सरशी करण्याच्या हेतूने का होईना काही कारखान्यांचे अध्यक्ष पुढे आले आहेत. शेतकऱ्यांच्या उसाच्या बिलातून साडेतीन कोटी रक्कम म्हैसाळच्या पाणीपट्टीसाठी जमा झाले. व्यापारी व शहरी लोकांचा पक्ष म्हणून आपली ओळख अधिक दृढ करणाऱ्या सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांना पुन्हा एक गड सर केल्याचा आनंद झाला. पण ज्या पोटतिडकीने हे नेते पाणीपट्टी भरावी म्हणून आवाहन करत आहेत, ते पाणी शेतकऱ्यांना पोहोचवण्याची जबाबदारी मात्र का घेत नाहीत? असा सवाल मल्लेवाडी, एरंडोली परिसरातील शेतकरी विचारत आहेत.सहा कोटी रुपये पाणीपट्टी भरून पाणीपट्टीसाठी नडवणाऱ्यांना चोख उत्तर शेतकऱ्यांनी दिले आहे. पण पाणी मिळण्याची अनिश्चितता, पैसे भरूनही शेतकऱ्यांना रात्र रात्र कालव्यावर पहारा द्यावा लागत आहे. आठ दिवस हेलपाटे मारूनही अर्धा एकर शेत भिजत नसल्याने शेवटी शेतकरी अधिकाऱ्यांना घेराव घालण्याचा मार्ग स्वीकारत आहेत. यापूर्वी या कालव्यावर अशी परिस्थिती कधीच उद्भवली नाही. मग यंदा असे होण्यास म्हैसाळचे अधिकारी कारणीभूत आहेत की राजकीय कारणे आहेत? असा प्रश्न आहे.
कळंबी कालवा सुरु होण्याआधीच बंद
By admin | Published: March 28, 2016 11:48 PM