खंडाळा : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाट ते शिंदेवाडी दरम्यान सहा पदरीकरणाच्या कामात ठेकेदाराने ठिकठिकाणी उत्खनन करून गौण खनिज वापरले. मात्र, रॉयल्टी न भरल्याने सहा पदरीकरणाचे काम तहसीलदारांनी बंद पाडून वाहने व मशीन सील केले. यावेळी ५ कोटी ३३ लाख रुपयांचा भरणा करण्याची नोटीस खंडाळ्याचे तहसीलदार शिवाजीराव तळपे यांनी बजावली. याबाबत माहिती अशी की, महामार्गाच्या सहा पदरीकरणाचे काम खंडाळा तालुक्यात शिंदेवाडीपासून खंबाटकी घाटापर्यंत अनेक वर्षांपासून सुरू आहे. महामार्गाचे रुंदीकरण, उड्डाणपूल, खंबाटकी घाटरस्ता या कामाचा ठेका रिलायन्स कंपनीकडे आहे. कंपनीने या कामासाठी सुमारे वीस किलोमीटर परिसरात उत्खनन केले. त्यातून निघालेल्या वेगवेगळ्या गौण खनिजांचा वापरही केला. उत्खननापोटी स्वामित्त्व रक्कम भरण्याबाबत कंपनीला वेळोवेळी सूचना करूनही ती शासनाकडे भरली गेली नाही. त्यानंतर जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्या आदेशानुसार ही कारवाई करण्यात आली.तहसीलदार शिवाजी तळपे, मंडलाधिकारी एस. एम. मरबळ, तलाठी एन. बी. खेताडे यांच्या पथकाने मंगळवारी खंबाटकी घाटात जाऊन उत्खनन केलेल्या भागाची पाहणी केली. खंबाटकी घाटात १ लाख ८ हजार ४५५ ब्रास उत्खनन झाल्याचे निदर्शनास आले. शासनाच्या नियमानुसार या उत्खननाबाबत ४ कोटी ३३ लाख ८२ हजार ११६ रुपये तसेच घाट ते शिंदेवाडी दरम्यान केलेल्या उत्खननाची प्रलंबित रक्कम ९८ लाख ९५ हजार ७७५ रुपये अशी एकूण ५ कोटी ३३ लाख रुपये भरणा करण्याची नोटीस रिलायन्स कंपनी, महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी ब्रीजकिशोर सिंग यांच्याकडे बजावली. घाटात सुरू असलेले काम बंद पाडले असून, याठिकाणी असलेले जेसीबी, डंपर सील करण्यात आले आहेत. महामार्ग कामाबाबत महसूल प्रशासनाने प्रथमच एवढी कडक पावले उचलली आहेत. दिलेल्या नोटिसीप्रमाणे वसुली भरली नाही तर संबंधितांवर फौजदारी करण्यात येईल, असा इशाराही दिला आहे. (प्रतिनिधी)
खंबाटकी घाटाचे काम बंद
By admin | Published: February 28, 2017 11:35 PM