तासगाव : तासगाव तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना गुरुवारी दुपारी मुसळधार पावसाने झोडपून काढले. ढगफुटी सदृश पावसाने बस्तवडे, खुजगाव, सावळज, वायफळे, वाघापूर, वज्रचौंडे, मणेराजुरीसह परिसरातील ओढे, नाल्यांना पूर आल्याचे चित्र होते. अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती.तासगाव पूर्व भागातील सावळज, मणेराजुरी, सावर्डे, वाघापूर, वज्रचौंडे, बस्तवडे, बलगवडे, खुजगाव, आरवडे, जरंडी, सिद्धेवाडी, दहिवडी, डोंगरसोनी, वायफळे, बिरणवाडी, अंजनी, गव्हाण या परिसरात मुसळधार पाऊस झाला. सावळसह परिसरातील गावात ढगफुटीसदृश पाऊस झाला. या पावसामुळे ओढे, नाल्यांना पूर आला. अनेक ठिकाणी रस्त्यावरून पाण्याचे लोट वाहत होते. त्यामुळे बस्तवडे, खुजगाव, सावळज, वायफळे, मणेराजुरी परिसरात अनेक ठिकाणी वाहतूक ठप्प झाली होती. मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांना जोरदार पावसामुळे दिलासा मिळाला आहे.मणेराजुरी, सावर्डे, वज्रचौंडे सावळज, डोंगरसनी, अंजनी, बिरणवाडी, खुजगाव सिद्धेवाडी दहिवडी परिसरात गुरुवारी दुपारी दोन ते तीन तास जोरदार पाऊस झाला. मुसळधार पाऊस विविध ठिकाणी झाला आहे. मणेराजुरीत व भोसलेनगर परिसर भागात जोरदार पाऊस झाला. द्राक्ष बागातून व रस्त्यातून पाणी वाहू लागले. सिद्धेवाडी तलाव, अंजनी तलावात पाण्याचा ओघ वाढला आहे.दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासापावसामुळे द्राक्ष बागेच्या सरीत पाणी साचले आहे. चांगला पाऊस झाल्याने पेरणीला वेग येईल. यावर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीस जोरदार पाऊस सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले. दुष्काळात होरपळलेल्या शेतकऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. जनावरांना चारा व शेतीला पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध होणार आहे.
Sangli: तासगाव पूर्व भागात ढगफुटीसदृश पाऊस, दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा
By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 4:16 PM