लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : गेला आठवडाभर सांगली जिल्ह्यात ढगांची दाटी कायम असून, ती आणखी काही दिवस अशीच राहणार आहे. ढगाळ वातावरणाचा अस्थमा रुग्णांना मोठा धोका निर्माण होतो. त्यामुळे ज्या रुग्णांना अस्थमाचा त्रास आहे. त्यांनी त्याची आधीच काळजी घेणे अपेक्षित आहे.
सध्याच्या काळात सूर्यदर्शन अपवादाने होत आहे. सूर्यप्रकाश कमी येतो. त्यामुळे रोगाला कारणीभूत ठरणारे जीवजंतू वाढतात. त्यातून संसर्गाचे प्रमाण वाढते. या काळात सर्दी-खोकला वाढतो. अनेकांना आधीच दम्याचा त्रास असल्यास त्यांना तो त्रास वाढतो. लहान मुलांमध्येदेखील बालदम्याचे प्रमाण वाढते. त्यामुळे ज्यांना दम्याचा त्रास आहे. त्यांनी त्याची काळजी घेणे गरजेचे असते.
चौकट
प्रतिकारशक्ती कमी
दम्यामुळे प्रतिकारशक्तीवर फारसा परिणाम होत नसल्याचे वैद्यकीय तज्ज्ञांचे मत आहे. मात्र, दम्याच्या उपचारासाठी स्टेरॉईड्स घ्यावे लागतात. त्यामुळे अनेकांमध्ये रोगप्रतिकारशक्ती कमी होते. त्यामुळे अन्य व्याधीही याच काळात जडतात.
बालकांनाही अस्थमा
बालकांना आधी सर्दी - खोकला होतो. मग दम लागतो, अशा स्थितीत थंड वातावरण, पावसात भिजणे, थंड पदार्थ टाळणे, तसेच उग्र वासापासून मुलांना दूर ठेवावे. लहान मुलांना बाहेर खेळताना चप्पल घालायला लावणे. त्यांचे अंथरुण, पांघरुण घराबाहेर आणून झटकावे. सकाळी व रात्रीची अंथरुण, पांघरुण वेगळे ठेवावे, हे साधे उपाय केल्यानंतरही निम्मा धोका कमी होतो, असे श्वसनविकारतज्ज्ञ डॉ. अनिल मडके यांनी सांगितले.
...ही घ्या काळजी
ज्यांना दमा आहे. त्यांनी आधीपासूनच थंड वातावरणात जाऊ नये, आपल्याला डॉक्टरांनी दिलेली औषधी कायम जवळ बाळगावी, तसेच ज्यांना पंप किंवा नेब्युलायझर देण्यात आले आहे. त्यांनी ते जवळ बाळगावे. तसेच संसर्ग होणार नाही, याची काळजी घ्यावी.
पावसाळी वातावरणात अधिक काळजी घ्या
पावसाळ्याच्या वातावरणात जिवाणू, विषाणूंचे प्रमाण वाढते. पूर्वी ॲलर्जी किंवा दम्याचा त्रास आहे, त्यांचा हा त्रास या काळात बळावतो. त्यामुळे या काळात श्वसनाचे जुने विकार असलेल्या लोकांनी अधिक काळजी घ्यावी. उबदार कपडे वापरावेत, उष्ण वातावरणात राहण्याची दक्षता घ्यावी.
- डॉ. अनिल मडके, श्वसनविकार तज्ज्ञ, सांगली