सांगली : जिल्ह्यातील काही भागात गुरुवारी सायंकाळी ढगाळ वातावरण होते. पाराही बुधवारच्या तुलनेत दोन अंशाने वाढला आहे. भारतीय हवामान खात्याच्या अंदाजानुसार येत्या सहा दिवसात कमाल व किमान तापमानात मोठी वाढ होण्याची चिन्हे आहेत.
सांगली शहरासह जिल्ह्याच्या काही भागात मागील गेल्या काही दिवसांत अवकाळीच्या पावसाने हजेरी लावली. गेल्या सहा दिवसांपासून त्यामुळे ढगाळ वातावरण होते. गुरुवारी सायंकाळीही ढगांची दाटी झाली. शुक्रवारपासून ढगांची दाटी हटण्याचा अंदाज आहे. दुसरीकडे तापमानात आता वाढ होऊ लागली आहे. बुधवारच्या तुलनेत गुरुवारी जिल्ह्याचे कमाल तापमान २ अंशांनी वाढले. बुधवारी कमाल तापमान ३२.२ अंश सेल्सिअस, तर गुरुवारी ३४.८ अंश सेल्सिअस नोंदले गेले.
किमान तापमान गुरुवारी २१ अंश सेल्सिअस होते. येत्या सहा दिवसात तापमानात वाढ होणार आहे. किमान तापमान २३ अंशापर्यंत तर कमाल तापमान ३५ अंशापर्यंत व त्यावरही जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कमी झालेला दिवसाचा उकाडा आता वाढणार आहे. रात्रीचा उकाडा अद्याप कायम असून, त्यात आणखी वाढ होईल.