अशोक पाटील । लोकमत न्यूज नेटवर्कइस्लामपूर : शिराळा मतदार संघात दोन्ही काँग्रेसच्या ताकदीपुढे भाजपची ताकद कमी पडते. त्यातच भाजपचे आमदार शिवाजीराव नाईक यांनी विकास आघाडीच्या माध्यमातून बांधलेली मोट राजू शेट्टी-सदाभाऊ खोत यांच्या वादाने भरकटत चालली आहे. याउलट इस्लामपूर मतदार संघात जयंत पाटील यांच्याविरोधात सदाभाऊ खोत आव्हान उभे करत आहेत. त्यांना अद्याप विविध गटांचे पाठबळ मिळालेले नाही. त्यामुळे आगामी ग्रामपंचायत निवडणुकीवर पक्षापेक्षा गटा-तटांचाच प्रभाव दिसून येणार आहे.शिराळा मतदार संघातील वाळवा तालुक्याच्या ४९ गावांत नानासाहेब महाडिक, पी. आर. पाटील, सी. बी. पाटील, जनार्दन पाटील, रवींद्र बर्डे यांच्यासारखे मातब्बर नेते आहेत. त्यांचे गटही सक्रिय आहेत. शिराळ्याचे आमदार शिवाजीराव नाईक यांना वैयक्तिक पातळीवर मानणाऱ्या सर्वच पक्षांतील कार्यकर्त्यांची संख्याही मोठी आहे. याचा फायदा आ. नाईक यांना होत आला आहे. मात्र शिराळ्यात दोन्ही काँग्रेस एकत्र आल्या की, भाजपचा टिकाव लागत नाही, हे वेळोवेळी स्पष्ट झाले आहे.इस्लामपूर मतदार संघातील ग्रामीण भागात आमदार पाटील यांचे वर्चस्व आहे. प्रत्येक गावात त्यांचे दोन-दोन गट कार्यरत आहेत. ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत दोन्ही गट एकमेकांच्या विरोधात भिडतात. काही गट लोकनेते राजारामबापूंचे छायाचित्र प्रचारात वापरतात, तर काहीजण आ. पाटील यांना डिजिटल फलकावर स्थान देतात. या मतदार संघात हुतात्मा संकुलाचे नेते वैभव नायकवडी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव शिंदे, राजारामबापू दूध संघाचे अध्यक्ष विनायकराव पाटील, राज्य बँकेचे माजी अध्यक्ष माणिकराव पाटील, जि. प. सदस्य जितेंद्र पाटील यांचेही गट आहेत. हे नेते आपापल्या पातळीवर ग्रामपंचायत निवडणुकीत उतरतात.कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आता ग्रामपंचायत निवडणुकीत भाजपला मोठे यश मिळवून देण्यासाठी प्रयत्न चालवले आहेत. यासाठी त्यांनी पहिल्या सत्रात इस्लामपूरचे नगराध्यक्ष निशिकांत पाटील यांना भाजपमध्ये दाखल केले आहे. आष्टा शहर व परिसरात वैभव शिंदे यांना जवळ करून तेथील ग्रामपंचायतीत यश मिळते का, याचीही चाचपणी सुरू आहे.
वाळवा-शिराळ्यात राजकीय समीकरणांचा गोंधळ
By admin | Published: July 07, 2017 11:25 PM