‘इस्लामपूर : स्वामिनाथन् आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि पूर्ण कर्जमुक्ती या दोन प्रमुख मागण्यांसह इतर मागण्या मान्य करुन घेण्यासाठी देशभरातील शेतकऱ्यांचा संघटित लढा उभारण्याचा एल्गार विविध राज्यांतील शेतकऱ्यांनी, नेत्यांनी येथे पुकारला. ११ ते २१ एप्रिलदरम्यान ‘सीएम टू पीएम’ अशी आसूड यात्रा नागपूर ते दिल्लीपर्यंत काढण्याचा निर्धारही व्यक्त करण्यात आला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे ‘सबका विकास आणि शेतकऱ्यांचा सत्यानाश’ असे धोरण असल्याची टीका यावेळी वक्त्यांनी केली.येथील राजारामबापू नाट्यगृहात शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथदादा पाटील यांच्या पुढाकाराने हुतात्मा भगतसिंग, सुखदेव, राजगुरू व रामचंद्र ऊर्फ आप्पा पाटील यांच्या स्मृतिदिनी शहीद अभिवादन मेळावा झाला. यापूर्वी शेतकरी नेत्यांची मिरवणूक काढण्यात आली. या मेळाव्यासाठी ‘प्रहार’चे संस्थापक आमदार बच्चू कडू, भारतीय किसान मंचचे अध्यक्ष सतनामसिंग बेरु (पंजाब), राजकुमार (तामिळनाडू), रवी दत्त, भागवत पांडे (मध्य प्रदेश), शांताकुमार (कर्नाटक), नितीन चौधरी (नागपूर), कालिदास आपेट, शिवाजी नांदखिले, महिला आघाडीच्या वंदनाताई माळी, शबाना मुल्ला, दिनकर दाभाडे उपस्थित होते.यावेळी आ. बच्चू कडू म्हणाले की, देशात सध्या जातीधर्माच्या नावाखाली राजकारण करुन बहुजनांची डोकी भडकवली जात आहेत. शेतकऱ्यांच्या ३0 हजार कोटींच्या कर्जमाफीसाठी राज्यकर्ते दिल्लीवाऱ्या करतात, यातच शेतकऱ्यांचे दुर्दैव आहे. शेतकऱ्यांनी ताकदीने संघटित होऊन संघर्ष करायला हवा. ११ ते २१ एप्रिलदरम्यान आसूड यात्रा काढून पंतप्रधान मोदींना त्यांनी दिलेल्या आश्वासनांची जाणीव करुन देणार आहोत.रघुनाथदादा पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांच्या जिवावर उठणाऱ्या या राज्यकर्त्यांबरोबर कधीही जाणार नाही. स्वाभिमानी, बळीराजा, महाप्रतापी बळीराजा या संघटना चळवळीत काम करायच्या लायकीच्या नाहीत. ज्यांनी शेतकऱ्यांना गोळ्या घातल्या, त्यांच्या जवळ बसत या नेत्यांनी शेतकऱ्यांच्या पाठीत खंजिर खुपसला आहे. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी आणि कर्जमुक्ती या दोन मागण्या पूर्ण करून घेऊच.मध्य प्रदेशचे रवीदत्त म्हणाले की, शेतकऱ्यांच्या सन्मानाची लढाई पूर्ण देशभरात ताकदीने लढणार आहोत. शांताकुमार म्हणाले की, सरकार चार टक्के कर्मचाऱ्यांना सातव्या वेतन आयोगापोटी १ लाख ४ हजार कोटी रुपये दर महिन्याला देते. मात्र ७0 टक्के शेतकऱ्यांना द्यायला त्यांच्याकडे पैसे नाहीत. कन्हैयालाल सिन्हा म्हणाले की, देशातील शहिदांच्या परिवाराप्रती आजही न्याय केला जात नाही. सीमेवर शहीद होणारी शेतकऱ्यांचीच मुले आहेत. मोदी किसानविरोधी आहेत. कालिदास आपेट यांनी प्रास्ताविक केले. हणमंत पाटील यांनी आभार मानले. रामजीवन बोंदूर, बाळासाहेब पठारे, शंकर गायकवाड, आनंद भालेकर, इकबाल जमादार, एल. के. पाटील, शंकर मोहिते, जगन्नाथ चिप्रीकर आदी उपस्थित होते. (वार्ताहर)
सीएम टू पीएम’ आसूड यात्रा ११ एप्रिलपासून
By admin | Published: March 24, 2017 12:25 AM