सांगली : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल शक्तिपीठ महामार्गाला विरोध फक्त नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांचा आहे. त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांशी चर्चा करून रेखांकन बदलण्यात येईल, असे वक्तव्य केले आहे. त्यांचे हे विधान अत्यंत चुकीचे असून, शक्तिपीठ महामार्गाला राज्यातील सर्वच जिल्ह्यांतून विरोध आहे. मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगलीचे शेतकरी त्यांची जागा दाखवतील, असा इशारा शक्तिपीठ महामार्ग शेती बचाव कृती समितीचे उमेश देशमुख यांनी दिला आहे.शक्तिपीठ महामार्ग बचाव कृती समितीचे उमेश देशमुख म्हणाले, राज्यातील सर्व जिल्ह्यांतील बाधित शेतकऱ्यांनी महामार्ग रद्द करण्यात यावा, हीच मागणी घेऊन आंदोलन केले आहे. शक्तिपीठ महामार्गाचे भूमी अधिग्रहण थांबवण्याच्या हालचाली सुरू झाल्या असल्यामुळे आंदोलन स्थगित केले होते; पण शेतकऱ्यांच्या बैठका चालूच आहेत. सांगली जिल्ह्यातील १९ गावांतील शेतकऱ्यांनी एकत्र येऊन सांगलवाडी येथे मेळावा घेऊन आंदोलनाची सुरुवात केली. जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींना बरोबर घेऊन जिल्हाधिकारी कचेरीसमोर तीव्र निदर्शने केली. धरणे आंदोलन केले.कोल्हापूर येथे झालेल्या मोर्चात सांगली जिल्ह्यातील शेतकरी मोठ्या संख्येने सहभागी झाले. तुळजापूर येथे झालेल्या साखळी उपोषणात जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सहभाग होता. तरीसुद्धा येथील शेतकऱ्यांचा विरोध त्यांना दिसत नाही का? असा सवालही त्यांनी उपस्थित केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निवडणुका डोळ्यासमोर ठेवून उलट-सुलट विधाने करीत असतील तर बाधित शेतकरी त्यांना त्यांची जागा नक्की दाखवतील, असा इशाराही त्यांनी दिला.यावेळी सतीश साखळकर, प्रभाकर तोडकर, उमेश एडके, प्रवीण पाटील, यशवंत हारूगडे, सुधाकर पाटील, सुनील पवार, ॲड. प्रदीप पोळ, विष्णू पाटील आदी उपस्थित होते.
आंदोलनाची ठिणगी सांगलीतूनचशक्तिपीठ महामार्गाविरोधात आंदोलनाची ठिणगी सांगलीतूनच पडली होती. या आंदोलनाची किंमत महायुती सरकारला लोकसभा निवडणुकीत भोगावी लागली होती. तरीही मुख्यमंत्री शिंदे म्हणतात, केवळ नांदेड आणि कोल्हापूर जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचाच विरोध आहे. अन्य जिल्ह्यांत विरोध नाही, त्यांचे हे विधान चुकीचे आहे. पुन्हा राज्यभर शक्तिपीठ मार्गाविरोधात आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही उमेश देशमुख यांनी दिला आहे.