कऱ्हाड-वाळवा तालुक्यातील कृष्णा काठावरील जमीन ओलिताखाली आली आणि परिसरात ऊसाचे फड दिसू लागले. त्यावर प्रक्रिया करणारा सहकारी तत्त्वावर उभारलेला कृष्णा कारखाना ऊस उत्पादकांसाठी वरदान ठरला. सुखसमृद्धी आली. प्रत्येक साखर कारखान्याने आपापल्या परिसरात मंदिरांची उभारणी केली आहे. सत्तेवरील अध्यक्ष त्या-त्या मंदिरांत जाऊन दर्शन घेऊनच दररोजच्या कार्यालयीन कामकाजाला सुरुवात करतात. काळमवाडीतील काळमदेवी वाळवा-शिराळा तालुक्यातील राजकीय नेत्यांचे श्रध्दास्थान बनले आहे.
लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक प्रचाराचा नारळ काळमवाडी येथेच फोडला जातो. शिराळा मतदार संघातील आमदार मानसिंगराव नाईक, माजी आमदार शिवाजीराव नाईक, सत्यजित देशमुख, सम्राट महाडिक आदी नेते प्रचाराचा नारळ येथेच फोडतात. जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांचेही ते श्रध्दास्थान आहे. कृष्णेच्या निवडणुकीतील पॅनलप्रमुखही वाळवा तालुक्यात प्रचारासाठी येतात, तेव्हा येथूनच प्रचाराला सुरुवात करतात.
कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले यांनी रुग्णसेवा, स्वत:च्या संस्था आणि साखर कारखाना यांचा प्राधान्यक्रम ठरवला आहे. माजी अध्यक्ष डॉ. इंद्रजित मोहिते काही कार्यकर्त्यांचे अनुकरण करतात, मात्र ज्येष्ठ विचारवंत यशवंतराव मोहिते यांच्या कार्याचे स्मरण करून दिल्याशिवाय सभासदाला पुढे जाऊ देत नाहीत. असे असले तरी सर्वच पॅनलप्रमुख कार्यकर्त्यांच्या श्रद्धा जपतात आणि प्रचाराचा नारळ काळमवाडीत फोडतात. तेथूनच प्रचाराचा धडाका सुरू होतो. यंदा मात्र निवडणुकीवर कोरोनाचे सावट असल्याने इच्छुक उमेदवार मोजक्याच कार्यकर्त्यांसोबत देवीचे दर्शन घेताना दिसत आहेत.
- अशोक पाटील, इस्लामपूर