सांगली : नव्या वर्षाच्या सुरुवातीला म्हणजेच जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात थंडी कायम राहणार असून कमाल व किमान तापमानात घट होणार आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार दिवसाच्या थंडीचाही अनुभव जिल्ह्यातील नागरिकांना येईल.
जिल्ह्याचे सरासरी कमाल तापमान गुरुवारी ३१ तर किमान तापमान १६ अंश सेल्सिअस नोंदले गेले. १ ते ६ जानेवारी या कालावधीत कमाल तापमानात कमालीची घट होऊन पारा २९ अंशांपर्यंत खाली येईल, असा अंदाज आहे. अंदाजाप्रमाणे पारा ३० पर्यंत खाली आल्यास दिवसाही थंडी जाणवणार आहे. हवामान खात्याच्या निरीक्षणानुसार किमान तापमान येत्या ६ दिवसांत १५ ते १६ अंशांच्या घरात राहणार आहे. किमान तापमानात फार मोठा बदल होणार नसला तरी कमाल तापमानात तो दिसून येणार आहे. जानेवारीचा पहिला आठवडा आकाश निरभ्र राहणार आहे. आजवरच्या नोंदीनुसार जिल्ह्याचे जानेवारीमधील सरासरी तापमान १४.४ तर कमाल तापमान ३१.८ इतके राहिले आहे. त्यामुळे किमान तापमान सरासरीच्या जवळ तर कमाल तापमान सरासरीच्या खाली जाणार आहे.