सांगली : कामगारांच्या प्रश्नावर २ सप्टेंबर रोजी होणाऱ्या देशव्यापी संपात आशा वर्कर्सही सहभागी होतील, अशी माहिती आशा वर्कर्स युनियनचे अध्यक्ष कॉ. शंकर पुजारी यांनी शनिवारी आशा वर्कर्सच्या मेळाव्यात दिली. जिल्ह्यातील आशा वर्कर्स युनियनचा मेळावा शनिवारी सांगलीत पार पडला. यावेळी कॉ. पुजारी म्हणाले की, २ सप्टेंबर रोजीच्या देशव्यापी संपात आशा वर्कर्स सहभागी होणार आहेत. कुणीही आशा वर्कर्स त्यादिवशी रुग्णालयाचे काम करणार नाहीत. २ सप्टेंबरला सकाळी ११ वाजता सांगलीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ््यापासून मोर्चा काढण्यात येणार आहे. युनियनच्या जनरल सेक्रेटरी कॉ. सुमन पुजारी म्हणाल्या की, युनियनच्यावतीने आशा वर्कर्सना नोकरीत कायम करावे व दरमहा किमान वेतन १५ हजार रुपये मिळावे, यासाठी औद्योगिक न्यायालयामध्ये याचिका दाखल करण्यात आली आहे. आशा व गटप्रवर्तक महिलांना नोकरीत नियमित करावे व नियमित कामगाराप्रमाणे वेतन द्यावे, असे आदेश न्यायालयाने सरकारला दिले आहेत, मात्र सरकार न्यायालयीन आदेश मानण्यास तयार नाही. आशा महिलांना केलेला कामाचा अत्यंत कमी मोबदला दिला जातो इतकेच नव्हे, तर अनेक कामे आशा कर्मचाऱ्यांकडून फुकट करवून घेतली जातात, अशी टीका त्यांनी केली. सांगली औद्योगिक न्यायालयाचा असा आदेश आहे की, न्यायालयात मूळ केस चालू असेपर्यंत कुणालाही कामावरून कमी करू नये .तरीही गटप्रवर्तक महिलांना प्रत्येक ११ महिन्याला नोकरीमध्ये ‘ब्रेक’ दिला जातो. न्यायालयीन आदेशाचा हा अवमान आहे. मेळाव्यात उर्मिला पाटील, विद्या कांबळे, चांदणी सूर्यवंशी, वर्षा गडचे, विजय बचाटे, अंजली पाटील, लक्ष्मी सहीने, मंगल कदम, अनुष कदम, कलावती मांडले, मीना साळुंखे यांनीही मार्गदर्शन केले. (प्रतिनिधी)
संपात आशा वर्कर्स सहभागी
By admin | Published: August 29, 2016 12:15 AM