कोकरुड : गवळेवाडी (ता. शिराळा) येथील जिल्हा परिषदेच्या शाळेतील खोल्या धोक्याच्या बनल्या आहेत. या खोल्यांची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी पालकांकडून होत आहे.
शिराळा पश्चिम भागातील गवळेवाडी शाळेचा शिक्षणाचा दर्जा सुधारल्याने येथील पटसंख्या ३७ वरून ५३ वर गेली आहे. दोन शिक्षकी असलेल्या शाळेची गुणवत्ता पाहून ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून सोयी, सुविधा केल्या आहेत. मात्र, शाळांच्या दोन्ही खोल्यांची दुरवस्था झाली आहे. एका खोलीवरीवरील कौले, त्याखालील लाकडे कुजून मोडून पडली आहेत. त्यामुळे छत कधी कोसळेल याचा नेम नाही. दुसऱ्या खोलीवरील पत्रा गंजला आहे. त्यातच चार वर्षांपूर्वी वादळी वाऱ्याने पत्रा उलटा झाल्याने पावसाळ्यात पाणी आणि उन्हाळ्यात उन्हाचा त्रास विद्यार्थ्यांना होत असतो. दोन्ही इमारतीची तातडीने दुरुस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
कोट
शाळेच्या दोन्ही खोल्या मोडकळीस आल्या असल्याने त्या मुलांच्या जिवावर बेतू शकतात. त्यांची दुरुस्ती करावी अथवा नव्याने इमारती बांधाव्यात यासाठी गेल्या चार वर्षांपासून पाठपुरावा सुरू आहे.
बाबा गोळे, सरपंच, गवळेवाडी.