विटा : घरात कोणीही नसल्याचे पाहून बंद घराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून चोरट्यांनी रोख साडेतीन लाखांसह सुमारे १९० ग्रॅम सोन्याचे दागिने असा एकूण ९ लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. ही घटना शुक्रवारी मध्यरात्री खानापूर तालुक्यातील बलवडी (खा.) येथे घडली. या घटनेने खानापूर पूर्व भागात घबराट पसरली असून याबाबत पुष्पा शिवाजी गायकवाड यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली आहे. सुमारे नऊ लाखांचा ऐवज चोरीस गेला असल्याची चर्चा असून, विटा पोलिसांत ७ लाख ३० हजार रुपयांचा ऐवज लंपास झाल्याची नोंद शनिवारी रात्री उशिरा करण्यात आली आहे. बलवडी (खा.) येथील पुष्पा गायकवाड पतीसह गायकवाड वस्ती येथे राहतात. त्यांची मुले कैलास व विकास सोने-चांदी गलाई व्यवसायानिमित्त दिल्ली येथे स्थायिक आहेत. पुष्पा यांचे पती शिवाजी यांना अर्धांगवायूचा त्रास असल्याने त्यांना मिरजेच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यामुळे घरी कोणीच नसल्याने घराला कुलूप होते. शुक्रवारी मध्यरात्री चोरट्यांनी घराच्या लोखंडी ग्रीलचे कुलूप तोडून, मुख्य दरवाजाचा कोयंडा मोडून घरात प्रवेश केला व कपाटात असलेल्या ३ लाख ५० हजार रुपये रोख रकमेसह ७० ग्रॅम वजनाची सोन्याची मोहनमाळ, ६० ग्रॅम वजनाचा सोन्याचा लक्ष्मीहार, ५० ग्रॅम वजनाच्या सोन्याच्या अंगठ्या, १० ग्रॅम वजनाचे कानातील झुमके असा एकूण ९ लाख ३३ हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. मात्र विटा पोलिसांत ७ लाख ३० हजारांच्या चोरीची नोंद झाली आहे. शनिवारी सकाळी पुष्पा यांना त्यांच्या घरी चोरी झाल्याचे त्यांच्या दिराने सांगितले. त्यापूर्वी त्यांचा मुलगा दिल्लीहून वडिलांना पाहण्यासाठी आला होता. त्याने घरात जाऊन पाहिले असता, रोख रक्कम व सोन्याचे दागिने लंपास झाल्याचे त्याच्या निदर्शनास आले. त्याने ही माहिती तात्काळ आईला दिल्यानंतर शनिवारी रात्री उशिरा सौ. पुष्पा गायकवाड यांनी विटा पोलिसांत फिर्याद दिली. पोलिस निरीक्षक मोहन जाधव पुढील तपास करीत आहेत. (वार्ताहर)
कडी-कोयंडा तोडून नऊ लाखांचा ऐवज लंपास
By admin | Published: June 26, 2016 1:03 AM