पलूस : कुंडल (ता. पलूस) येथील क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापू लाड यांच्या स्मारकाच्या कामाची पाहणी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांनी केली. तसेच झालेल्या कामाबाबत त्यांनी समाधानही व्यक्त केले.
यावेळी आमदार अरुण लाड, जिल्हा परिषदेचे सदस्य शरद लाड, जिल्हा बँकेचे संचालक किरण लाड, श्रीकांत लाड, प्रांताधिकारी गणेश मरकड उपस्थित होते.
डॉ. चौधरी म्हणाले, हे स्मारक बापूंच्या कार्याचा जाज्ज्वल्य इतिहास दर्शवते. यासाठी क्रांती कारखान्याने ६० गुंठे जमीन दिली असून बापूंच्या कार्याची माहिती पुढील पिढीला कळावी म्हणून शासनाने चार कोटी ९५ लाख रुपयांचा निधी देऊन हे स्मारक उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.
अरुण लाड म्हणाले, या स्मारकात २५० लोकांची बैठक व्यवस्था आहे. प्रशस्त हॉल, साउंड सिस्टीम, बापूंनी केलेल्या कार्याचा जीवनपट, ग्रंथालय, बगीचा, विद्युत रोषणाई करण्यात आलेली आहे. या स्मारकामुळे कुंडलच्या सौंदर्यात भर पडली आहे. चौधरी यांनी, बापूंचा अस्थिकलश ज्या ठिकाणी ठेवला आहे, तेथे क्रांती कारखाना एक कोटी ५० लाख रुपये खर्चून समाधिस्थळ उभे केले जात आहे. तेथेही आठ खोल्यांतून बापूंचा चित्ररूप जीवनपट दर्शवला जाणार आहे. तेथेही भेट देऊन कामाची पाहणी केली.
चौकट..
क्रांतिअग्रणी डॉ. जी. डी. बापूंच्या स्मारकाशेजारी क्रांतिसिंह नाना पाटील यांचे स्मारक आहे; पण तेथे शासनाकडून अद्याप त्यांचा पुतळा बसवण्यात आलेला नाही. त्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करण्याची गरज आहे, अशी मागणी आमदार अरुण लाड यांनी केली.