सांगली : कोरोना लसीकरणाची रंगीत तालीम शुक्रवारी (दि. ८) जिल्ह्यात तीन ठिकाणी आयोजित केली आहे. सांगलीत हनुमाननगरमधील महापालिकेचे आरोग्य केंद्र, इस्लामपुरात उपजिल्हा रुग्णालय व कवलापुरात प्राथमिक आरोग्य केंद्रात ती होईल. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जितेंद्र डुडी व आरोग्याधिकारी डॉ. मिलिंद पोरे यांनी ही माहिती दिली.
या रंगीत तालमीमध्ये आरोग्य कर्मचारीच सहभागी होणार आहेत. प्रत्येक ठिकाणी २५ कर्मचारी लसीचे लाभार्थी समजून प्रात्यक्षिक होईल. यामध्ये प्रत्यक्ष लसीकरण किंवा टोचणी होणार नाही. लस टोचणी, टोचणी झालेल्या लाभार्थीला विश्रांती, काहीवेळांनी रक्तचाचणी, आरोग्य तपासणी आदी प्रक्रिया प्रात्यक्षिक स्वरुपात होईल. प्रत्यक्ष लस येईल तेव्हा प्रात्यक्षिकाचा फायदा होईल, असे डॉ. पोरे म्हणाले.
प्रात्यक्षिकासाठी स्वत: डॉ. पोरे यांच्यासह वरिष्ठ अधिकारी उपस्थित राहतील. राज्यभरात सकाळी नऊ वाजता एकाचवेळी रंगीत तालीम होणार आहे.
दरम्यान, यासंदर्भात गुरुवारी (दि. ७) आरोग्याधिकाऱ्यांची व्हिडीओ कॉन्फरन्स झाली. त्यामध्ये रंगीत तालमीविषयी सूचना देण्यात आल्या.
----------------