जत : जत शहरातील तीन तांड्यांवर बुधवारी रात्री ते गुरुवारी पहाटे साडेपाचपर्यंत एकाचवेळी पोलिसांनी साडेतीन तास कोम्बिंग आॅपरेशन करून आठ मोटारसायकली व मोटार जप्त केली. दोन अट्टल गुन्हेगार, एक हवा असलेला आरोपी आणि वॉरंटमधील चार अशा एकूण सात जणांना अटक करण्यात आली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे खळबळ माजली होती.
या कारवाईत जत, उमदी, कवठेमहांकाळ व सांगली गुन्हे अन्वेषण विभागातील नऊ अधिकारी, एक जलद कृती दल व ६२ कर्मचारी सहभागी झाले होते. या कारवाईमुळे जत शहरातील गुन्हेगारांत खळबळ माजली आहे. जत येथील उमराणी रोड, सातारा रोड व मधला तांडा येथे पोलीस व अधिकाऱ्यांनी बुधवारी रात्री दोन ते गुरुवारी पहाटे साडेपाचपर्यंत कोम्बिंग आॅपरेशन करून, कागदपत्र नसलेल्या व संशयितरित्या झाकून ठेवलेल्या आठ मोटारसायकली, मोटार असा मुद्देमाल जप्त केला आहे. दहा महिन्यांपूर्वी अचकनहळ्ळी (ता. जत) येथील मधुकर शिंदे यांच्या घरावर पडलेल्या दरोड्यातील संशयित फरारी आरोपी रमेश नामदेव चव्हाण व त्याचा मुलगा सागर रमेश चव्हाण (रा. दोघे उमराणी रोड येथील तांडा जत) यांना ताब्यात घेऊन अटक केली आहे.
याशिवाय पाहिजे असलेला व संशयितरित्या फिरत असलेला बबलू ऊर्फ संदीप शंकर चव्हाण (रा. मोरे कॉलनी जत) याला पोलिसांनी ताब्यात घेऊन अटक केली आहे. वॉरंटमधील चारजणांना ताब्यात घेण्यात आले आहे. अशा एकूण सात जणांना ताब्यात घेऊन अटक करण्यात आली आहे. मधला पारधी तांडा येथील ३३०० रुपयांची दारू पोलिसांनी जप्त केली आहे.पोलिसांनी अचानक कारवाई केल्यामुळे या तिन्ही पारधी तांड्यातील नागरिकांत काहीवेळ घबराट निर्माण झाली व त्यांनी पोलिसांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला. परंतु पोलीस सतर्क असल्यामुळे व पोलिसांनी या कारवाईसंदर्भात गोपनीयता बाळगल्यामुळे कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. उपविभागीय पोलीस अधिकारी दिलीप जगदाळे, पोलीस निरीक्षक शिवाजी गायकवाड, पोलीस उपनिरीक्षक अनिल माने, रणजित गुंडरे, सचिन गढवे, वर्षा डोंगरे आदी या कारवाईत सहभागी होते.पोलिसांवरील हल्ल्यामुळे प्रकार उघडकीसतीन दिवसांपूर्वी उमराणी रोड तांडा येथील अट्टल गुन्हेगार सुभाष दिलीप काळे याला वॉरंट बजावून जत पोलीस ताब्यात घेण्यासाठी गेले असता, संशयित आरोपी सुभाष काळे व त्याच्या इतर दोन अनोळखी साथीदारांनी पोलीस हवलदार प्रवीण पाटील व कर्मचारी संदीप साळुंखे यांच्यावर हल्ला करून त्यांना जखमी करण्याचा प्रयत्न केला होता. त्याअनुषंगाने पोलिसांनी कोम्बिंग आॅपरेशन करून ही कारवाई केली असल्याचे समजते. या कारवाईमुळेच मोठे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.